Breaking News

सावधगिरी हवीच

गेले जवळपास पाच आठवडे देशातील कोरोना फैलावाची आकडेवारी खाली जाताना दिसते आहे. कोरोना फैलावाच्या संदर्भात सातत्याने भीषण परिस्थिती अनुभवणार्‍या महाराष्ट्रातही अखेर चित्र काहिसे दिलासादायक होताना दिसते आहे. अर्थात परिस्थिती बदलत असली तरी कोरोना पूर्णत: गेलेला नाही हे आपण सारेच जाणतो. त्यामुळे सावधगिरी सोडून चालणार नाही.

दुर्दैवाने महाराष्ट्र सुरूवातीपासूनच कोरोनाच्या फैलावात आघाडीवर राहिल्याने आपल्याकडे व्यवहार पूर्ववत होण्यास इतर राज्यांच्या तुलनेत अधिक विलंब लागला आहे. सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स तसेच नाट्यगृहे सुरू करण्याची घोषणा सरकारने नुकतीच केली. दरवर्षी दिवाळीसारख्या सणाच्या मुहुर्तावर मोठ्या बजेटचे सिनेमे रिलीज होण्याची आपल्याकडची परंपरा यंदा प्रथमच मोडली आहे. नवे सिनेमे नाहीत तसेच सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी मिळाली असली तरी काही निर्बंध आहेतच, त्यामुळे प्रेक्षक किती प्रमाणात मनोरंजनासाठी तिकडे वळतील याबद्दल संबंधितांच्या मनात साशंकता आहे. सिनेमागृहे आणि नाट्यगृहे यांना 50 टक्के क्षमतेने व्यवहार करण्यास मुभा देण्यात आली आहे. एकमेकांपासून एका सीटचे अंतर राखून सिनेमा वा नाटक बघण्यास किती जण येतील हा प्रश्न आहेच. त्यात खाद्यपदार्थ आत नेण्यास मनाई असल्याचाही गर्दीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रीलीजसाठी नवे सिनेमेच नाहीत. या सगळ्यामुळे महिनाभर तरी तोटाच सहन करावा लागेल अशी भीती मल्टिप्लेक्सचे मालक व्यक्त करीत आहेत. तिकिटांचे दर कमी करून वा अन्य काही आकर्षक योजना जाहीर करून प्रेक्षकांना आकर्षून घ्यावे लागेल, असे जिथे मल्टिप्लेक्स चालकांना वाटते. तिथे मराठी नाटक निर्मात्यांना 50 टक्के क्षमतेने नाट्यगृह भरायचे म्हटल्यास नाटकाचा प्रयोग लावणे कितीसे परवडणार? मुळातच फारसा नफा न कमावणार्‍या आणि कशाबशा तग धरून असलेल्या मराठी रंगभूमीला या अशा निर्बंधांच्या काळात उभारी कशी मिळणार हा खरोखरंच एक गंभीर प्रश्न आहे. सिनेमागृहे आणि नाट्यमंदिरे सुरू करणार्‍या ठाकरे सरकारचा खरोखरीची मंदिरे उघडण्यास असलेला विरोध मात्र अद्यापही कायमच आहे. भारतीय जनता पक्षाने मंदिरे उघडण्याची मागणी लावून धरल्याने अडवणुकीचे धोरण म्हणून त्यादृष्टीने अद्यापही पाऊल उचलले जाताना दिसत नाही. एकीकडे हा असा विरोधासाठी विरोध केला जात असतानाच येत्या 23 तारखेपासून नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा-कॉलेजे सुरू करण्याचा विचार बोलून दाखवण्यात आला आहे. तसेच दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा मे महिन्यात घेता येऊ शकेल असेही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. गुजरातनेही अलीकडेच या परीक्षा मेपर्यंत पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे. बोर्डाच्या परीक्षा कशा आणि कधी होणार याबाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी वर्गातील प्रत्यक्ष उपस्थितीकरिता मात्र हे तिन्ही घटक आताच फारसे उत्सुक दिसत नाहीत. सणासुदीच्या हंगामानंतर संसर्गाची दुसरी लाट येऊ शकते, अशी भीती अनेक स्तरांवर व्यक्त केली गेली आहे. हिवाळ्यात संसर्गाचे प्रमाण वाढण्याची शक्यताही चर्चेत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर शाळा-कॉलेजे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय तेव्हाच्या परिस्थितीचे नीट अवलोकन करूनच घेतला जावा, असे मत संबंधितांकडून व्यक्त होताना दिसते. गेला जवळपास सव्वा महिना देशात कोरोना फैलावाचे प्रमाण खाली जाताना दिसले असले तरी सावधगिरी सोडून चालणार नाहीच.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply