Breaking News

महायुतीच्या प्रचारात विखे-पाटील सक्रिय

शिर्डी : प्रतिनिधी

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अद्याप काँग्रेस पक्ष सोडलेला नाही, तरी त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांचा प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, राधाकृष्ण विखे यांनी गुरुवारी शिर्डीत शिवसेना, भाजप, तसेच विखे समर्थक पदाधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेऊन सदाशिव लोखंडे यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी जोरदार प्रयत्न करावेत, असे आवाहन केले आहे. विखे समर्थक असलेले करण ससाणे यांनी जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन विखे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय यांनी भाजपत जाऊन नगर दक्षिण लोकसभेची निवडणूक लढविली. तेव्हापासून राधाकृष्ण विखे हे काँग्रेसपासून दुरावण्यास सुरुवात झाली. काँग्रेस आघाडीचा प्रचार करण्याऐवजी त्यांनी सुजय यांचा प्रचार करणे पसंत केले. नगरची निवडणूक संपताच सुजय विखे यांचे कार्यकर्ते आणि प्रचार यंत्रणा शिर्डीमध्ये दाखल झाली आहे. राधाकृष्ण विखे यांनी गुरुवारी शिर्डी विधानसभा क्षेत्रातील विविध गावांत बैठका घेऊन युतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांना ताकत द्या, विजयी करा, असे आवाहन केले आहे. गुरुवारी त्यांनी दिवसभर मतदारसंघात युतीच्या प्रचारासाठी कॉर्नर सभा घेतल्या. दुपारी शिर्डीत शिवसेना-भाजप, तसेच विखे समर्थक पदाधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेतली. त्यात राधाकृष्ण विखे यांनी शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना विजयी करा, आशा सूचना दिल्या. या बैठकीला मार्गदर्शन करून विखे तेथून प्रचारासाठी लगेच बाहेर पडले. पदाधिकार्‍यांनी ही बैठक सुरूच ठेवली आणि लगेचच पालकमंत्री आणि भाजप नेते प्रा. राम शिंदे या बैठकीला उपस्थित राहिले. भाजप-शिवसेना आणि विखे यांचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत. त्यामुळे चिंता नाही. सदाशिव लोखंडे यांना निवडून द्या, त्यासाठी एकदिलाने काम करा, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीनंतर राधाकृष्ण विखे यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला. या बैठकीस भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शिवसेनेचे कमलाकर कोते, काँग्रेस पदाधिकारी आणि विखे समर्थक कैलास बापू कोते, ज्ञानदेव गोंदकर, अभय शेळके, नगराध्यक्ष योगिता शेळके, सुजित गोंदकर, नितीन कोते आदी उपस्थित होते.

राधाकृष्ण विखे यांनी नगरमध्ये मुलासाठी अंधारातून प्रचार केला, पण शिर्डी लोकसभा मतदारसंघात ते उजेडात राहुन महायुतीचा प्रचार करीत आहेत. यावरून तुम्हीच ठरवा ते कोणत्या पक्षात आहेत.

-प्रा. राम शिंदे,

पालकमंत्री, नगर

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply