परिसरातील आठ नळपाणी योजना बंद, चिल्लार नदी कोरडी




कर्जत : बातमीदार
तालुक्यातील सोलनपाडा येथे असलेल्या पाझर तलावाने तळ गाठला आहे. त्यामुळे या पाझर तलावामधून खालच्या बाजूला असलेल्या नदीमध्ये पाणी सोडण्याचे बंद झाल्याने चिल्लार नदी कोरडी झाली असून, त्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नळपाणी योजना कोलमडून पडल्या आहेत.
कर्जत तालुक्यातील सोलनपाडा येथे रायगड जिल्हा परिषदेचा पाझर तलाव असून, त्याची दुरुस्ती शासनाने केली होती. त्यामुळे धरणाचे आयुष्य वाढले होते. या पाझर तलावातील पाणी तेथून वाहणार्या चिल्लार नदीमध्ये सोडल्याने परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला होता. मात्र जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाने अनेक वर्षे या पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम केलेले नाही, परिणामी पाझर तलावात फार कमी प्रमाणात पाणीसाठा होत आहे. पाझर तलावातील पाणी खालच्या बाजूला असलेल्या शेती आणि चिल्लार नदीमध्ये सोडण्यासाठी पाईपलाईन टाकून बोगदा तयार केला आहे. यावर्षी पाझर तलावातील पाणी या बोगद्याच्या खाली गेले आहे. पाझर तलावात सध्या जेमतेम 15 टक्के पाणीसाठा असून तो डेड म्हणून ठेवण्यात येतो. परिणामी मागील आठ दिवसांपासून पाझर तलावातील पाणी नदीमध्ये सोडणे बंद झाले आहे. त्यामुळे चिल्लार नदी कोरडी पडली आहे.
चिल्लार नदीमध्ये विहीर खोदून लघुपाटबंधारे विभागाने काही गावांसाठी नळपाणी योजना उभारल्या आहेत. मात्र नदीच कोरडी पडल्याने त्या नळपाणी योजनाही कोलमडून पडल्या आहेत. त्यामुळे सोलनपाडा, कामतपाडा, हिरेवाडी, रजपे, टेबरे, शिंगढोल, आंबिवली आणि त्या परिसरातील 12 गावातील लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. याबाबत काही उपाययोजना करण्याची मागणी टेंबरे ग्रामपंचायतीकडून करण्यात येत आहे.
पाझर तलावात कमी पाणीसाठा असल्याने पाणी नदीमध्ये सोडण्याचे बंद झाले आहे. त्यामुळे आमच्या भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाने पाझर तलावातील पाणी पंप लावून बाहेर काढावे आणि आमची तहान भागवावी.
-पंढरीनाथ पिंपरकर, सदस्य, टेंबरे ग्रामपंचायत, ता. कर्जत
पाझर तलावात मोठ्या प्रमाणात माती आणि दगड यांचा गाळ साचला असून, तो काढला जात नसल्याने पाणी साठा कमी होत आहे. त्यामुळे यावर्षी पाझर तलावातील गाळ काढण्याची मोहीम हाती घ्यावी.
-हरेश घुडे, माजी सरपंच, टेंबरे, ता. कर्जत
पाझर तलावात डेड पाणीसाठा ठेवावा लागतो, त्याप्रमाणे या पाझर तलावातही पाणी ठेवण्यात आले आहे. मात्र पाणीटंचाई लक्षात घेता त्यावर उपाययोजना करण्याचा विचार सुरू आहे.
-आर. डी. कांबळे, उपअभियंता, लघुपाटबंधारे विभाग, कर्जत