खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खालापूर हद्दीत हॉटेल व ढाबा चालकांनी रस्ता दुभाजक तोडल्यामुळे अपघाताची घटना घडली असून, अपघातानंतर मात्र कंत्राटदाराने तातडीने दुभाजक दुरूस्ती केली आहे.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर ते खोपोली रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. खालापूर ते महडपर्यंत दोन्ही मार्गिका तयार झाल्या असून रस्त्याच्या मधोमध दुभाजक तयार करण्यात आले आहेत. खालापूरकडून खोपोलीकडे जाताना घोडवली गावाच्या थांब्याजवळ लेन कटींग ठेवण्यात आली होती. त्यानंतर थेट महड फाटा येथे लेन कटींग होती. मध्ये गाव नसल्यामुळे कंत्राटदाराने लेन कटींग ठेवली नव्हती. मात्र हॉटेल व ढाबा चालकांनी दुभाजक तोडून रस्ता तयार केला. मात्र दोन मार्गिकांमध्ये दुचाकी उभी राहील एवढीसुद्धा जागा शिल्लक नसून, कारसारखे वाहन अर्धेअधिक रस्त्यावर राहणार असल्यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे येथील दुभाजक तोडून रस्ता तयार करणार्यावर कारवाईची मागणी होत असताना शनिवारी बागेश्री हॉटेलजवळ अचानक वळण घेणार्या पिकअपला दुचाकीस्वाराने धडक दिली होती. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. या अपघातानंतर दुभाजक दुरूस्ती झाली असून, दुभाजक तोङणार्यावर कारवाई मात्र प्रलंबित आहे.