Breaking News

पाताळगंगा एमआयडीसीतील ‘रॉयल कार्बन’च्या प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका -आमदार महेश बालदी

पनवेल, मुंबई ः प्रतिनिधी
पाताळगंगा औद्योगिक वसाहतीतील वानिवली येथील मे. रॉयल कार्बन प्रा. लि. या कंपनीमार्फत होणार्‍या प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याबाबत आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला आणि या समस्येवर शासनाचे लक्ष वेधले. हा प्रश्न त्यांनी सभागृहातही मांडला.
पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमधील मे. रॉयल कार्बन प्रा. लि. वानिवली या कंपनीमार्फत होणार्‍या प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असून घातक अशा कार्बन ब्लॅक पावडरमुळे नागरिकांना अनेक आजारांची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांना दिलासा देण्यासाठी या प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली, अशी विचारणा आमदार महेश बालदी यांनी केली.
यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तरात म्हटले की, पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमधील मे. रॉयल कार्बन प्रा. लि. वानिवली या कंपनीमार्फत होणार्‍या प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याची बाब खरी असून रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार या परिसरातील श्वसन विकार, नेत्ररोग, त्वचारोग आदी रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
तथापि, परिसरातील कोणत्या उद्योगामुळे ही रुग्णवाढ झाली याची निश्चितता नमूद केली नाही किंवा कसे याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालात उल्लेख नाही. हरित लवाद (नवी दिल्ली) यांच्या आदेशानुसार, मे. रॉयल कार्बन ब्लॅक प्रा. लि. वानिवली या उद्योगास केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व निरी, नागपूर यांनी 12 ऑगस्ट 2021 रोजी भेट देऊन संपूर्ण परिसरातील हवेची गुणवत्ता तपासली होती. त्यानुसार या परिसरातील हवेची गुणवत्ता राष्ट्रीय वातावरणीय हवा गुणवत्ता मानकेनुसार विहित मर्यादेत आढळून आली, मात्र त्या ठिकाणी रस्त्यावर, तलावात काळे पाणी, काळी माती जात आहे याकडे गांभीर्याने बघावे, योग्य कृती करावी आणि तेथील नागरिकांची भावना व्यथा जाणून घ्याव्यात. 21व्या शतकातील मानक त्या ठिकाणी लागू करा तसेच त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी सभागृहात केली. यावर मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी व योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन सभागृहात दिले.

Check Also

‘रोटरी’तर्फे पनवेलमध्ये कापसे पैठणीचे प्रदर्शन व विक्री

वर्षा ठाकूर, शुभांगी घरत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त थेट विणकर ते ग्राहक …

Leave a Reply