Breaking News

लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर लोकमत लोकनेता पुरस्काराने सन्मानित

पनवेल ः रामप्रहर वृत्त
राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देत जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करणारे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांना गुरुवारी (दि. 26) लोकमत लोकनेता सन्मान पुरस्काराने मुंबईत गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यास सन्माननीय अतिथी म्हणून राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मनसेचे नेते माजी मंत्री बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, उपाध्यक्ष विजय शुक्ला, संपादक अतुल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ म्हणून पनवेल मतदारसंघ गणला जातो. या मतदारसंघाचे 2009 सालापासून सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून संपूर्ण जबाबदारीने आमदार प्रशांत ठाकूर कार्यरत आहेत. कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दूरदृष्टीतून पनवेल विधानसभा क्षेत्रात विकासाचे महापर्व आले. प्रगतीपासून दूर आणि भकास झालेल्या पनवेलला विकासाचा चेहरा देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे आपल्या कार्यकौशल्यातून पनवेलचा विकास घडविणारे, वक्तृत्व, दातृत्त्व आणि नेतृत्त्व गुणसंपन्न नेता व समाजप्रिय व्यक्तिमत्व म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांचा पनवेलकरांना नेहमीच अभिमान राहिला आहे. नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करतानाच लोकांना अपेक्षित असलेला शहरासह ग्रामीण भागाचा विकास त्यांच्याकडून झाला आहे.
आमदार निधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना, जिल्हा वार्षिक नियोजन, 25ः15 मुलभूत विकास सुविधा, आदिवासी विकास योजना अशा विविध विकासकामांच्या योजनेतून त्यांनी पनवेलचा विकास घडविला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय, प्रशासकीय भवन, मुंबई-पनवेलचे प्रवेशद्वार असलेले उड्डाणपूल, भुयारी गटार योजना, रस्त्यांचा विकास, नगर परिषेदचे पनवेल महापालिकेत निर्माण आणि त्या माध्यमातून महापालिका हद्दीत विकास, पनवेल न्यायालय इमारतीसाठी शासनाकडून निधी, उपजिल्हा रुग्णालयाचे 200 खाटांमध्ये विस्तार, प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा, अमृत योजना, सामाजिक सभागृह, विसर्जन घाट, अंगणवाडी, स्मशानभूमी, गटारे, शाळा दुरूस्ती, पुल, संरक्षक भिंत, हायमास्ट, नळ पाणीपुरवठा योजना अशा अनेक विकासकामांचा झंझावात करतानाच शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचविण्याचे काम केले जात आहे. त्याचबरोबर श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर, जयपूर फूट, खारघर मॅरेथॉन, कला, क्रीडा, नाट्य, व सांस्कृतिक महोत्सव, शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या, उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत असे अनेक उपक्रम गेल्या 30 वर्षांपासून सुरू असून आमदार प्रशांत ठाकूर यांचे कार्य प्रेरणादायी ठरले आहे. त्यामुळे अनेक सन्मान, बहुमान त्यांना प्राप्त झाले आहे. त्यातच लोकमतच्या वतीने त्यांना लोकनेता हा सन्मान प्रदान करण्यात आला असून त्या निमित्ताने पनवेलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
लोकमतकडून सन्मान प्रदान करत असताना आमदार प्रशांत ठाकूर यांना दिलेल्या मानपत्रात म्हटले आहे की, समाजकारण आणि राजकारण यांची योग्य सांगड घालत आपण महामुंबईच्या प्रगतीमध्ये मोलाची भूमिका बजावत आहात. संवेदनशीलता, कठोर परिश्रम, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपण करत असलेली जनसेवा ही नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. आपल्या कार्याला मिळालेली लोकमान्यता ही आपण लोकनेता असल्याचे अधोरेखित करते. आपल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल लोकमत समूहातर्फे आपणास मानपत्र देऊन सन्मानित करताना अत्यानंद होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply