Breaking News

थ्री डीचा चष्मा चाळीशीचा झाला…

आपण पिक्चरला गेल्यावर थिएटरचा डोअर किपर अर्धे तिकीट कापून घेऊन उरलेले देताना त्यासोबत एक विशिष्ट चष्मा देतो आणि तो लावून चित्रपट पाहताना पडद्यावरच्या गोष्टी आपल्या समोरच घडताहेत असे वाटते….
त्री मिती अर्थात थ्री डायमेन्शन (थ्री डी) चित्रपटाशी आपण चित्रपट रसिकांची झालेली पहिली ओळख. या ओळखीला तब्बल चाळीस वर्ष पूर्ण झालीदेखील.
आपण पाहिलेला पहिला थ्री डी चित्रपट छोटा चेतन (मुंबईत रिलीज सप्टेंबर 1984). मूळ तमिळ भाषेतील हा चित्रपट हिंदीत डब होऊन आल्यावर हा चष्मा नेमका कोणता? यापासून तो लावून पडद्यावर अडीच तीन तास पाहिल्यावर काही त्रास तर होणार नाही ना? डोकेदुखी तर होणार नाही ना अशा केवढ्या शंका, प्रश्न काही विचारू नका आणि ते स्वाभाविक होतेच. पडद्यावरच्या जगात हरखून/हरवून जाण्याची आपली चित्रपट प्रेक्षक संस्कृती. चित्रपटगृहाच्या अंधारात एकदा का पडद्यावर गोष्ट सुरू झाली की त्यातील गीत संगीत व नृत्य आणि संवाद यातून रमायचे हीच आपली पद्धत. चित्रपट आवडला तर तो डोक्यावर घेत डोक्यात फिट करायचा आणि आवडला नाही तर तो तसाच पडद्यावर ठेवून बाहेर पडायचे असे आपले आपले सोपे समिकरण. त्यात आता हा चष्मा लावून पडद्यावर पाह्यचे तर चष्मा सांभाळायचा की पिक्चरमध्ये काय चाललंय यात मग्न व्हायचे असा प्रश्न. त्यात भर मूळ तमिळ भाषेतील चित्रपट. त्या काळात दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट फारसे आपले वाटत नसत. त्यांची हिंदी रिमेक जमली असेल तर ते चित्रपट स्वीकारले जात. (प्यासा सावन, एक दुजे के लिए, हिम्मतवाला, सदमा ही काही उदाहरणे.) छोटा चेतन या नावातच यात बालनायक हिरो असणार हे उघड होते.
थ्री डायमेन्शन म्हणजे काय याची मुद्रित माध्यमातून दखल घेतली गेल्याने चित्रपट पाहण्याचे (एन्जॉय करण्याचे) एक आधुनिक तंत्र आले आहे याची जाणीव झाली. त्या काळातील चित्रपटविषयक लेखनात प्रबोधनही असे (आज त्याची जागा प्रमोशनने घेतली आहे हे जनसामान्य जाणून आहेत).
‘छोटा चेतन’चे मुंबईतील मेन थिएटर मेट्रो होते. असं काही विशेष असेल तर त्यासाठी मेट्रो चित्रपटगृह हुकमी. संगीतम श्रीनिवास राव दिग्दर्शित पुष्पक या संवादरहित चित्रपटाचे मेन थिएटर मेट्रोच होते. मेट्रोत सुरुवातीपासूनच गुरुवारी नवीन चित्रपट प्रदर्शित होतोय. मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांना मात्र वरळीतील सत्यम चित्रपटगृहाचे शुक्रवारचे फर्स्ट शोचे तिकीट दिले. एका नवीन अनुभवाला सामोरे जाण्याची मानसिक तयारी झाली होती. चित्रपट पाहणे म्हणजे तिकीट काढून आत गेलो असे अजिबात नसते आणि त्या हाऊसफुल्ल गर्दीतील एक होऊन आपण चित्रपट पाहत असतो. चित्रपट हे समूहातील एक बनून एन्जॉय करण्याचे एक माध्यम.
चष्मा लावताना समिक्षकाचा चष्मा काढून ठेवायचा का हा प्रश्न असला तरी मी समिक्षकाचा चष्मा कधीच लावला नसल्याने थ्री डीचा चष्मा पटकन फिट बसला आणि पडद्यावर नजर सेट झाली. पहिली काही दृश्ये अवघडलेपण वाटले. अचानक डोळ्यासमोर काही आल्याने दचकून व्हायला झाले. हळूहळू पडद्यावरच्या जगात रमलो. नवीन तंत्र आवडले. एक थ्रीलिंगफुल अनुभव वाटला. पब्लिक रिपोर्टही सकारात्मक होता. बच्चेकंपनी अतिशय खुश होऊन सत्यमबाहेर पडत होती. पिक्चर हिट होणार याचेच हे लक्षण होते. नेहमीच चित्रपट रसिकांच्या आवडीनिवडीवर चित्रपटाचे यशापयश ठरलयं.
…पिक्चर सुपर हिट म्हणजे अनेक आठवड्यांचा हुकमी मुक्काम. आपल्या देशात रंगीत दूरदर्शन व व्हिडीओ यांचे 1982च्या एशियाडच्या वेळेस आगमन होताच नवीन चित्रपट प्रदर्शित होताच रात्रीपर्यंत त्याची चोरट्या मार्गाने व्हिडीओ कॅसेट यायची आणि त्याचा जोरदार फटका चित्रपटगृहांना बसत होता. त्याला एक उत्तर म्हणून हे थ्री डायमेन्शन चित्रपट तंत्र आहे असाही एक निष्कर्ष काढण्यात आला. चित्रपटाच्या यशापयशाच्या नोंदीच्या
अलिकडे पलिकडे बरेच काही असतेच असते…
आता जो हिट है वो फिट्ट है अशा अलिखित नियमानुसार थ्री डायमेन्शन चित्रपट निर्मितीत वाढ अपेक्षित असली तरी ती सोपी अजिबात नव्हती. कारण असे चित्रपट दाखविण्यात थिएटर प्रोजेक्शनमध्ये करावे लागणारे काही बदल हे एक आव्हान होतेच आणि चित्रपट सुरू होण्याअगोदर प्रेक्षकांना चष्मा द्या आणि संपल्यावर ते जमा करा. त्याची काळजी घ्या. यात वेळ जात होता आणि थिएटरला अधिक स्टाफ हवा होता. मोठ्या शहरात हे जमून जायचं, पण छोट्या शहरात आणि ग्रामीण भागात हे चित्रपट दाखवणे अधिकच आव्हानात्मक होते. मुळात अशा चित्रपटांच्या चित्रीकरणापासून आव्हाने होती.
बालप्रेक्षकांना आवडेल अशीच कथा पटकथा हवी. ‘शिवा का इन्साफ’ची तशी होती आणि दिग्दर्शक राज एन. सिप्पी याने गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील आपल्या चित्रपटाच्या सेटवर शूटिंग रिपोर्टींगसाठी मुंबईतील आम्हा सिनेपत्रकारांना आवर्जून आमंत्रित केले. तेव्हा जॅकी श्रॉफ व पूनम धिल्लॉन यांच्यावर एक दृश्य चित्रीत होत असतानाच वारंवार होत असलेले रिटेक हे नवीन तंत्रज्ञान सोपे नाही हे तर सांगत नव्हते ना? छायाचित्रणकार अशोक मेहता अतिशय मेहनतीने कॅमेर्‍यात मग्न होता आणि या अनुभवाचे रिपोर्टिंग केले. प्रत्यक्षात चित्रपटसृष्टीतील भटकंतीमधील माझे लाईव्ह अनुभव असे केवढे तरी विविधांगी आणि इस्टमनकलर.
शिवा का इन्साफ, महाशक्तीमान, सामरी असे काही थ्री डायमेन्शन चित्रपट पडद्यावर आले, पण त्यांना फारसे यश प्राप्त झाले नाही. चष्म्यातून चित्रपट पाहण्याचे नाविन्य राहिले नव्हते ना… नव्वदच्या दशकात छोटा चेतन मध्ये उर्मिला मातोंडकरचे फक्कड नृत्य समाविष्ट करुन रिपीट रनला प्रदर्शित करण्यात आला. (रिपीट रन प्रथेत थ्री डी पिक्चरही) गोरेगावच्या सम्राट थिएटरच्या नूतनीकरणानंतरचा हा पहिला चित्रपट.
कालांतराने मल्टीप्लेक्स युगात आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रोजेक्शन आणि त्याबरोबरच ग्लोबल युगातील डिजिटल पिढी या सगळ्यात थ्री डायमेन्शन चित्रपटाचे सातत्य दिसतेय. मराठीतील पहिला थ्री डायमेन्शन चित्रपट निर्माण करण्याचे श्रेय महेश कोठारेंना. झपाटलेला चित्रपटाची सिक्वेल अर्थात पुढचा भाग झपाटलेला 2 हा मराठीतील पहिला थ्री डायमेन्शन चित्रपट.
मल्टीप्लेक्स युगातच रमेश सिप्पी दिग्दर्शित सर्वकालीन बहुचर्चित ‘शोले’वर तांत्रिक सोपस्कार करून चित्रपट थ्री डायमेन्शन करण्यात आला आणि मला चित्रपट समीक्षकांना आवर्जून मल्टीप्लेक्समध्ये दाखवला, तेव्हाही गब्बरसिंगची तीच दहशत आणि दरारा.
मल्टीप्लेक्स युगात थ्री डायमेन्शन चित्रपटात विविधता केवढी तरी. विदेशी चित्रपट (अवतार इत्यादी), दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट हिंदीत डब (बाहुबली, आरआरआर वगैरे), हिंदी सायन्स फिक्शन (रा. वन.ळ, 2.0), थ्रीलर (निमल), पौराणिक पाश्र्वभूमी (हनुमान, आदिपुरुष, कल्की 2898), ऐतिहासिक चित्रपट (तान्हाजी, पद्मावत), भूतपट (भेडिया, भूत रिटर्न) , रहस्यरंजक (राज 3, भोला, हॉन्टेड), पिरियड चित्रपट (83) वगैरे वगैरे. चित्रपटाची निर्मिती बजेट अवाढव्य झाली, एकेका चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्द्धत एकादा प्रादेशिक भाषेतील चित्रपट नक्कीच निर्माण होईल, मोठ्याच प्रमाणावर देश विदेशातील प्रदर्शन, बिग स्क्रीनवरील अफाट महामनोरंजन, चित्रपट म्हणजे अवाढव्य आर्थिक उलाढाल अशा वातावरणात थ्री डायमेन्शन चित्रपट आता रुळलेत.
एका मोठ्याच प्रवासानंतरचे हे यश आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा हा प्रत्यय आहे. एकेकाळी काही मध्यमवर्गीय चित्रपटगृहात पडद्यावर भुरकट चित्र दिसे आणि मोनो साऊंड सिस्टीममुळे आवाजात दोष असे. तरीही जनसामान्य प्रेक्षकांनी अनेक चित्रपट डोक्यात फिट केले, डोक्यावर घेतले. त्याचीच गोड गोड गोड फळे आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल वातावरणातील चित्रपटसृष्टीला मिळताहेत.
थ्री डायमेन्शन चित्रपट चाळीस वर्षांनंतर कुठे?
याचे सकारात्मक उत्तर, प्रचंड प्रगतिपथावर असेच आहे.
चित्रपट माध्यमाचा प्रवास बायस्कोप, मूकपट असा सुरू होऊन तो बराच पुढे चाललाय. त्यात चित्रपटाचा दर्जा तो काय हो हा मात्र गंभीर विषय ठरेल.
– दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply