Breaking News

जेएनपीटीच्या जासई उड्डाणपुलाचा भाग कोसळला

एक कामगार ठार, सहा जण गंभीर

उरण ः प्रतिनिधी, वार्ताहर
जेएनपीटीच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या जासई उड्डाणपुलावर काम सुरू असताना मंगळवारी (दि. 2) सायंकाळी 5.15 वाजताच्या सुमारास दुर्घटना घडली. पीयर कॅपचे काँक्रीट भरताना परातीला बूम प्लेअर क्रेनचा धक्का लागून ते अचानक कोसळले. यात एक कामगार जागीच ठार झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
जेएनपीटी परिसरात जेएनपीटीच्या माध्यमातून तीन हजार कोटी खर्चून सात उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत. त्यापैकी दास्तान ते शंकर मंदिरदरम्यान दीड किमी लांबीच्या जासई उड्डाणपूलाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. येथील 50 पीयर कॅपपैकी 20 क्रमांकाच्या पीयर कॅपचे काम मंगळवारी चालू असताना 14 मीटर उंचीवर स्लॅब भरण्याच्या कामासाठी परातीही बांधण्यात आल्या होत्या. त्यावर 10-15 कामगार काम करीत होते. या वेळी अचानक परातीला स्लॅब भरणार्‍या बूम प्लेअरचा धक्का लागला.
या धक्क्याने परात स्लॅब, स्टील, मलब्यासह खाली कोसळली. यात एक कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जेएनपीटी आणि एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. त्याचप्रमाणे त्यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मलबा बाजूला करण्याच्या कामासाठी जेएनपीटी गव्हाण फाटादरम्यानची वाहतूक सुमारे दोन तास बंद करण्यात आली होती.
या संदर्भात ठेकेदार जे. कुमार कंपनीचे सहाय्यक अभियंता पीराजी कांबळे यांनी, पीयर कॅप भरताना परातीला अचानक बूम प्लेअर क्रेनचा धक्का लागून स्टील, परात, मलब्यासह कोसळून अपघात झाला असल्याची माहिती दिली.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply