Breaking News

महाडच्या शासकीय गोदामातील धान्याचा दोनदा पंचनामा का केला?

आमदार प्रशांत ठाकूर यांचा सरकारला सवाल

पनवेल, मुंबई ः प्रतिनिधी
महाड शहरातील नवेनगर येथील शासकीय गोदामातील धान्यसाठा 22 व 23 जुलै 2021च्या महापुरामध्ये खराब झाला असल्याचे निदर्शनास आले असून शासकीय गोदामातील धान्य वितरणाकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दाखल केला होता. हा प्रश्न गुरुवारी
(दि. 23) सभागृहात उपस्थित झाला.
नवेनगर गोदामातील भिजून खराब झालेल्या धान्यसाठ्याचा पंचनामा केला असता रेकॉर्डमधील नोंदीपेक्षा 200 ते 300 जादा धान्याची पोती आढळून आली हे खरे आहे का, तसेच संबंधित विभागातील अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे व अन्नधान्याचे नियमित वितरण न केल्यामुळे गोदामातील धान्य भिजून खराब झाले ही बाब खरी आहे काय, असाही सवाल या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला.
या प्रश्नावर अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले की, महाड शहरातील नवेनगर येथील शासकीय गोदामातील धान्यसाठा 22 व 23 जुलै 2021च्या महापुरामध्ये खराब झाल्याचे अंशतः खरे आहे. 22 व 23 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचे पाणी ओसरल्यानंतर 24 जुलै 2021 रोजी पाहणी करून गोदामाचा प्राथमिक पंचनामा 26 जुलै 2021 रोजी करण्यात आला आहे. त्या पुरात महाड नवेनगर येथील गोदामात पाच ते सहा फूट पाणी जाऊन सरासरी नऊ थरापर्यंत गोदामातील धान्य भिजून खराब झाल्याचे निदर्शनास आले आहे. असे उत्तर देतानाच पंचनाम्याअंती पुराच्या आधीच्या साठ्यापैकी जे धान्य खराब झाले त्याची आकडेवारी व शिल्लक साठ्याची आकडेवारी पाहता असे झाल्याचे आढळून येत नाही, असे उत्तर मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आणि ते उत्तर विसंगत असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी ‘मग दोनदा पंचनामा का केला,’ असा प्रतिसवाल केला. त्यावर मंत्री भुजबळ यांनी या गोदामातील 616 क्विंटल तांदूळ व 108 क्विंटल गहू वितरणयोग्य असे आढळून आले असून खराब झालेले धान्य खाण्यायोग्य आहे का याच्या तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आला होता, पण तो मनुष्य व प्राणी या दोघांच्या खाण्यायोग्य नसल्याने खतासाठी कृषी विभागाकडे दिला आहे, असे सभागृहात सांगितले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply