Breaking News

प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर उत्तुंग झेप घ्या -लोकनेते रामशेठ ठाकूर

न्हावे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कर्मवीर जयंती साजरी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर जीवनात यशाची उत्तुंग झेप घ्यावी, असा यशोमंत्र रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना दिला. संस्थेच्या पनवेल तालुक्यातील न्हावे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बुधवारी (दि. 25) आयोजित 137व्या कर्मवीर जयंती व पारितोषिक वितरण सोहळ्याच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
विद्यालयाच्या प्रांगणात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे, समग्र शिक्षा अभियानाच्या वतीने विद्यालयात देण्यात आलेल्या संगणक लॅबचे आणि विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. यानंतर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात या परिसरातील रयत शिक्षण संस्थेची वाटचाल आणि इथे घडलेल्या विद्यार्थ्यांची उदाहरणे देत विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे आणि त्या जोरावरच आपण आपली आपली स्वप्नपूर्ती करू शकतो, असे प्रतिपादन केले.
विद्यालयाने अल्पावधीत घेतलेली उत्तम भरारी ही नजरेत भरणारी असून मुख्याध्यापक प्रमोद कोळी, स्थानिक शाळा समितीच्या सर्व सदस्य आणि परिसरातील शिक्षणप्रेमी नागरिकांच्या सहकार्याने; त्याचप्रमाणे गव्हाण विद्यालयाच्या सहकार्याने इतर मान्यवरांच्या सहकार्यामुळे या विद्यालयाची विद्यार्थीसंख्या अर्थात पटवृद्धी आणि भौतिक विकासाविषयी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुकोद्गार काढले व अधिक गुणवत्तेची अपेक्षा व्यक्त करून त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
व्यासपीठावर विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन चंद्रकांत भोईर, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, माजी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, उपसरपंच राजेश म्हात्रे, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष गजानन म्हात्रे, म्हसेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष सी.एल. ठाकूर, वनिता महिला विकास मंडळाच्या अध्यक्ष मीनाक्षी पाटील, कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या संजीवनी म्हात्रे, संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ज्योत्स्ना ठाकूर, रायगड विभागाचे नवनियुक्त विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे, सहाय्यक विभागीय अधिकारी विलासराव जगताप, ग्रामपंचायत सदस्य सुनिता भोईर, रंजना पाटील, जागृती म्हात्रे, तुषार भोईर, चंद्रकांत पाटील, गणेश नाखवा, किशोर घरत, जॉर्ज मिनीजस, रोजी बचाडो, शांताबाई म्हात्रे, विजया ठाकूर, गव्हाण विद्यालयाचे मुख्याध्यापक गोवर्धन गोडगे, संस्थेचे लाईफ मेंबर व जनरल बॉडी सदस्य रवींद्र भोईर, रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक किशोर पाटील, रयत सेवक संघाचे नेते नुरा शेख, गव्हाण विद्यालयाच्या ज्युनिअर कॉलेज विभागाचे प्रमुख बाबुलाल पाटोळे, गव्हाण विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक देवेंद्र म्हात्रे, सागर रंधवे आदी मान्यवर तसेच न्हावे विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका कुसुम ठोंबरे, उपशिक्षक प्रसन्न ठाकूर, दर्शना भोईर, रिद्धी म्हात्रे तसेच विद्यार्थी, पालक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यालयाचे आधारस्तंभ, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यालयास 18 लाख रुपये सभागृह बांधकाम निधी व सुविधा तसेच सुशोभिकरणासाठी साडेआठ लाख रुपये अशी एकूण 26 लाख 50 हजार रुपयांची देणगी दिल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने स्थानिक शाळा समिती आणि मुख्याध्यापक यांच्या हस्ते त्यांचा या वेळी कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. विद्यालयाच्या प्रगतीसाठी यापुढेही निधी कमी पडू देणार नसल्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जाहीर केले.
मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी तसेच विद्यालयातील क्रीडा, वक्तृत्व, निबंध, रांगोळी आदी स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली, तर विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालोपयोगी साहित्य वितरित करण्यात आल्याबद्दल सरपंच विजेंद्र पाटील, व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष गजानन म्हात्रे तसेच संगीत साहित्य संच भेट दिल्याबद्दल वनिता महिला मंडळाच्या अध्यक्ष मिनाक्षी पाटील आदींचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन विद्यालयाचे मुख्याध्यापक व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व जनरल बॉडी सदस्य प्रमोद कोळी यांनी केले. प्रमुख वक्त्या संस्थेच्या माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य संजीवनी म्हात्रे यांनी कर्मवीर अण्णांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना सांगितल्या. सूत्रसंचालन गव्हाण विद्यालयाचे उपशिक्षक सागर रंधवे यांनी केले, तर माजी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply