पर्यटकांनी गाड्या रस्त्यावर लावल्याने वाहतूक कोंडी
मुरूड : प्रतिनिधी
ऐतिहासिक जंजिरा किल्ला पहाण्यासाठी पर्यटकांना राजपुरी व खोरा बंदरातून बोटीने जावे लागते. मात्र खोरा बंदरातील वाहनतळामध्ये गाड्या उभ्या करू दिल्या जात नाहीत. त्यामुळे पर्यटकांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस गाड्या उभ्या कराव्या लागत असल्याने तेथे वाहतूक कोंडी होत आहे.
दोन वर्षांपूर्वी खोरा बंदराचा विकास करण्यात आला होता. त्यासाठी महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाने अडीच कोटी रुपये खर्च केले. त्यातून खोरा बंदराला दगडाची संरक्षक भिंत, तिकीट घर, पर्यटकांसाठी विश्रांती गृह, शौचालय आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. मात्र येथील वाहनतळ पूर्ण होता होता एक वर्षापेक्षा अधिक काळ गेला. संबंधित ठेकेदाराने सदरचे काम अर्धवट ठेवले होते. त्याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्याने मेरी टाइम बोर्डाने हे काम तत्परतेने पूर्ण केले. मात्र त्याठिकाणी वाहने उभी करू दिली जात नसल्याने पर्यटकांना आपली वाहने येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूस उभी करावी लागत आहेत. त्यामुळे शनिवार, रविवारी त्याचप्रमाणे सुट्यांच्या दिवशी येथे वाहतूक कोंडी होते. हे वाहनतळ लवकरात लवकर सुरु करावे, अशी मागणी पर्यटक करीत आहेत.