खोपोली : प्रतिनिधी
समाजातील तळागाळातील कष्टकरी, शेतकरी, उपेक्षित समाजाच्या व्यथा, त्यांच्या संवेदना जागृत करणे, त्याचे चित्रण लेखक आणि पत्रकारांनी आपल्या लेखणीतून मांडणे काळाची गरज आहे. ‘पाणकळा‘कार र. वा. दिघे यांनी या समाजाच्या व्यथा आपल्या लेखणीतून सर्वांपुढे मांडल्या. त्यांचा वारसा त्यांचे कुटुंबीय जपण्याचा प्रयत्न करीत असल्याने आम्हा साहित्यिकांना त्यांचा अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी खोपोली येथे रविवारी (दि. 26) केले.
कै. र. वा. दिघे यांचा शतकोत्तर रौप्यजयंती सोहळा खोपोली येथील ब्राह्मण सभा सभागृहात रविवारी संपन्न झाला. या वेळी मधु मंगेश कर्णिक बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, खोपोलीच्या नगराध्यक्ष सुमन अवसरमल, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, कोमसाप रायगड अध्यक्ष सुधीर शेठ, कार्याध्यक्ष प्रदीप ढवळकर, सदस्य दिलीप गडकरी, नरेंद्र हर्डीकर, पत्रकार नितीन भावे, साहित्यिका, नलिनी पाटील, र. वां. चे चिरंजीव वामन दिघे, उज्वला दिघे, यशवंत सपकाळ इत्यादी मान्यवर या वेळी व्यासपिठावर उपस्थित होते.
पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. उपेक्षितांचे प्रश्न मांडणे सोडविणे हे त्यांचे काम आहे. पूर्वीच्या काळात आचार्य अत्रे रोखठोक लिहायचे. त्यांचा वारसा मधुकर भावे यांनी जपला, असे मधु मंगेश कर्णिक यांनी सांगितले.
व्यास, वाल्मिकी इंग्रजी असते, तर ते जागतिक स्तरावर पोहोचले असते. पण र.वा. हे ग्रामीण अस्सल मराठी असल्यामुळे ते उपेक्षित राहिले. दिघे यांच्या लेखणीत अस्सल मराठी व ग्रामीण बाज असल्यामुळे ते सर्वत्र पोहोचले नाही, पण त्यांचे कुटुंबिय ते पोचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगून कर्णिक यांनी दिघे कुटुंबाचे कौतुक केले.
र. वा. दिघे यांच्यासारखा लेखक दुर्गम भागात जातो, तेथील कष्टकरी आदिवासी, कातकरी, ठाकूर, समाजात राहून पड रे पाण्यात, पानकळा सारख्या दर्जेदार कादंबर्या लिहितो. त्यांच्या कादंबर्यांवर चित्रपट निघतात, असा हा ग्रामीण साहित्याचा राजा नेहमी दुर्लक्षित राहिला, त्याची कुणीही दखल घेऊ नये, ही शोकांतिका असल्याची खंत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी या वेळी व्यक्त केली. नगराध्यक्षा सुमन अवसरमल, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, प्रदीप ढवळकर, सुधीर शेठ यांनीही मनोगत व्यक्त केले.
वामन दिघे यांनी प्रास्ताविकात रवांच्या साहित्याचा थोडक्यात आढावा घेतला. त्यांनी लिहिलेल्या ‘साहित्य शिल्प‘ या रवां च्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन जयमाला पाटील यांनी केले. साहित्यिक व खोपोलीतील नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. नितीन भावे यांनी आभार मानले.