पनवेल : वार्ताहर
मावळ लोकसभा मतदारसंघाचे मतदान येत्या सोमवारी (दि. 29) होत असून हे मतदान शांततेत, नि:पक्षपातीपणे, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी मतदारांना केले आहे. या निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून प्रत्येक बुथवर पोलीस यंत्रणा असणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे. कोणत्याही प्रकारे मतदान केंद्रात मतदारांना त्रास होईल. तशाच प्रकारे मतदान केंद्राच्या बाहेर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. मतदारांना कोणीही प्रलोभन करू नये. तसेच धाक-दपटशा दाखवू नये. अशा प्रकारे तक्रारी आल्यास संबंधितांवर त्वरित कारवाई करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत गैरप्रकार टाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे यापूर्वीच प्रतिबंधक कारवाई म्हणून 17 लोकांना तडीपार करण्यात आले आहे. तर काहींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांना अशा व्यक्तींकडून बाधा येणार नाही. विविध पोलीस पथके मतदान केंद्र परिसरात कार्यरत असणार आहेत. कुठेही अनुचित प्रकार घडत असल्यास 100 नंबर किंवा नियंत्रण कक्ष यांच्याशी संपर्क साधावा. तसेच व्हॉटस्अप नंबर 9372419799 यावर आपली तक्रार करावी. आपले नाव गुप्त राखण्यात येईल व तक्रारीची शहानिशा करून कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल.