खालापूर : प्रतिनिधी
गोवंशीय प्राण्याची कत्तल करून हे मांस विक्रीसाठी मुंबईत घेऊन जाणारा टेम्पो रविवारी (दि. 20) पहाटेच्या सुमारास खालापूर पोलिसांनी पकडला असून, तब्बल चार लाख रुपये किमतीचे चार टन मांस आणि त्याची वाहतूक करणारा टेम्पो असा एकूण साडेसात लाखांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी मुस्ताक मोहमद हनिफ सय्यद (28, रा. कुर्ला मुंबई), नसीम अहमद साबिर अली (30, रा. उत्तर प्रदेश) आणि गनी कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून होणारी गोवंश प्राण्यांची मांस वाहतूक रोखण्यासाठी रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या आदेशावरून खालापूर पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. त्यांना आयशर टेम्पोतून मांस वाशीला पाठविण्यात येणार असल्याची गुप्त खबर मिळाली होती. त्यानुसार सावरोली टोल नाक्यावर सापळा रचण्यात आला. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास संशयित आयशर टेम्पो पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना पोलीस पथकाने तपासणीकरिता अडवला. टेम्पोतील चालक मुस्ताक सय्यद आणि नफिस अली यांची पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केल्यावर ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये कत्तल केलेले गोवंश जातीच्या प्राण्याचे मांस आढळले. सदरचे मांस मालेगाव, नाशिक येथून कुर्ला, मुंबई येथे गनी कुरेशी याच्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती टेम्पोचालकाने पोलिसांना दिली. पशुधन विकास अधिकारी डी. एस. गायकवाड आणि पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला असून मुस्ताक सय्यद व नफिस अली यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास निरीक्षक अनिल विभुते करीत आहेत.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …