Breaking News

महाडमध्ये बेकायदेशीर वाळू उत्खनन

महसूल विभागाची दोन ठिकाणी कारवाई; महसूल विभागाची दोन ठिकाणी कारवाई

 

महाड : प्रतिनिधी

परवाना नसताना महाड तालुक्यातील सावित्री नदीतून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे. महसूल विभागाने एका आठवड्यात तालुक्यातील दोन ठिकाणी धाडी टाकून बेकायदेशीरित्या वाळू उपसा करणार्‍यांवर कारवाई केली. या कारवाईत एक होडी व वाळू मिळून एकूण दहा लाख 53 हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. महाड तालुक्याच्या खाडीपट्टा विभागात असलेल्या सावित्री नदी किनारी जूई बुद्रुक या गावामध्ये वाळू उपसा केला जात असल्याची माहिती महाडचे तहसीलदार सुरेश काशीद यांना मिळाली होती. त्यांनी नायब तहसीलदार प्रदीप कुडळ, जुईचे तलाठी ऋषिकेश भोसले व इतर कर्मचार्‍यांच्या उपस्थित 26 मार्चला पहाटे तीन वाजता या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत वाळू उपसा करणार्‍यांकडून सहा ब्रास वाळू नेऊ शकणारी पाच लाख रुपये किमतीची होडी आणि एक ब्रास वाळू असा पाच लाख सहा हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. तसेच नदीतून बेकायदेशीर वाळू उपसा करणार्‍या सहा जणांवर महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील टोळ गावातदेखील महाड महसूल कर्मचार्‍यांनी छापा टाकत अनधिकृत वाळू उत्खनन करणार्‍यांना कारवाईचा बडगा दाखवला. या वेळी पाच लाख 52 हजार 987 रुपयांचा ऐवज जप्त केला. तसेच मुनीब सरखोत आणि इतर पाच ते सहा जणांवर भादवी कलम 379, 34 आणि गौण खनिज उत्खनन कलम 21, 21(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जुई येथील तलाठी ऋषिकेश भोसले यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply