पनवेल ः प्रतिनिधी
शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी केलेल्या बोगस कर्ज प्रकरणाच्या घोटाळ्यामुळे बुडालेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे भवितव्य अंधारातच आहे. विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता 24 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा तळोजा तुरुंगातील मुक्काम नऊ दिवसांनी वाढला आहे. सध्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे न्यायालयाच्या कामावरही निर्बंध आले आहेत. तातडीच्या महत्त्वाच्या नव्या प्रकरणांचीच सध्या सुनावणी घेतली जात आहे आणि इतर प्रकरणांसाठी दिवसातून केवळ तीन तासांचा वेळ दिला जात आहे. त्यामुळे न्यायालयाचे प्रत्यक्ष कामकाज अत्यावश्यक कामासाठी फक्त तीन तास चालते. त्यानंतर ऑनलाइन व्हिडीओ प्रणालीद्वारे काही काळ कामकाज होत आहे. कर्नाळा बँक घोटाळ्यासंदर्भात शनिवारी (दि. 15) झालेल्या सुनावणीसाठी सक्तवसुली संचालनालयातर्फे अॅड. गोन्साल्वीस हे तब्येत बरी नसल्याने उपस्थित नव्हते, तर विवेक पाटील यांच्यातर्फे अॅड. राहुल ठाकूर उपस्थित होते. वकिलांच्या विनंतीवरून न्यायालयाने पुढील सुनावणी 24 जानेवारी रोजी होईल, असा निर्णय दिला.