कळंबोली, पनवेल : बातमीदार, वार्ताहर
वैश्विक महामारीची दुसरी लाट समाज जीवनावर घातक परिणाम करीत आहे. या वेळी सामाजिक सुरक्षा व कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्याचे काम पोलीस करीत आहेत. एकीकडे कायदा-सुव्यवस्था सांभाळून लॉकडाऊनच्या कालावधीत ज्यांचे हातावर पोट आहे अशा आदिवासी बांधवांना कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी आपल्या सहकार्यांसमवेत किराणा मालाचे मोफत वाटप केले.
पोलीस यंत्रणा जितकी हवी हवीशी वाटते तितकीच ती काही वेळा नकोशी ही वाटते. खाकी वर्दीतील खाक्या कोणाच्याच नशिबी येऊ नये असे सर्वांनाच वाटते, मात्र या खाकी वर्दीच्या आड एक मायेचा पाझर झिरपत असतो आणि त्याच्या ओलाव्याने समाजामध्ये आनंद निर्माण करू शकतो, असे कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांनी आपल्या कृतीतून करून दाखविले आहे.
कोरोना काळात सर्वच काही बंद असताना व ज्याचे उदरनिर्वाह हे दैनंदिन मिळणार्या मोलमजुरी वरच अवलंबून आहे. अशा रोडपालीजवळील फुडलैंड कंपनीच्या जवळ असलेल्या 50 ते 60 आदिवासी समाज बांधवांच्या कुटुंबीयांना 15 दिवस पुरेल एवढे किराणा मालाचे सामान आपल्या सहकार्यांसमवेत वाटप करून सामाजिक बांधिलकीची जपणूक केली आहे.
अनपेक्षितपणे आदिवासी बांधवांना किराणा मालासारखे जीवनावश्यक सामान घरपोच मिळाल्याने त्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. या वेळी कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्यात आले.
आदिवासी वाडीवरील महिलांनी व आबालवृद्धांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना आशीर्वादासमवेत धन्यवादही दिल्याने कळंबोली पोलीस ठाण्यातील कर्मचारीही चांगलेच सुखावले.
खांदेश्वर पोलिसांतर्फे अन्नदान
पनवेल : कोरोनामुळे संचारबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे हातावर पोट असणार्या नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. त्याचाच विचार करून खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देविदास सोनवणे यांच्या वतीने झोपडपट्टीतील नागरिकांना अन्नदान करण्यात आले. लॉकडाऊनमुळे गरीब, गरजू नागरिकांना घराबाहेर पडणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांचे अन्नाची परवड होते. अनेकांना उपाशी राहावे लागत असल्याचे समोर आले आहे. अशा खांदा कॉलनी, सेक्टर 12 येथील झोपडपट्टीतील नागरिकांना पोलिसांतर्फे अन्नाचे वाटप करण्यात आले.