कर्जत : बातमीदार
नेरळ-कळंब या रस्त्याच्या 200 मीटर लांबीच्या भागाचे सिमेंट काँक्रीटीकरण चार वर्षे रखडले होते, मात्र स्थानिकांची गरज लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने हेे काम सुरु केले आहे. नेरळ-कळंब या मार्गावरील नेरळ युवराज सोसायटीपासून साई मंदिर नाका या भागातील 200 मीटर लांबीचा रास्ता सिमेंट काँक्रीटचा बनवला जाणार होता. मात्र कळंबपासून नेरळ रेल्वे फाटकापर्यंतच्या रस्त्याचे काम करणार्या ठेकेदाराने युवराज ते साई मंदिर नाका या रस्त्याचे काँक्रीटीकरण केले नव्हते. या भागातील सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी या काँक्रीटीकरण कामाबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील वर्षी नवीन ठेकेदार नेमला, परंतु तरीदेखील त्या भागातील रस्त्याचे कॉक्रीटीकरणाच काम अपूर्णच राहिले होते. या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाने या भागातील रस्त्यावरील खड्डे मातीने भरले. दरम्यान, स्थानिकांच्या तक्रारींमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढून 200 मीटर लांबीच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणास सुरुवात केली आहे. या रस्त्याच्या एका बाजूचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर दुसर्या बाजूचे काम केले जाईल.