कामोठे : रामप्रहर वृत्त
कामोठ्यामधील सर्व रस्त्यांवरील गतिरोधकांवर काळे पांढरे पट्टे मारण्यात यावेत, अशी मागणी भाजप भटके विमुक्त सेलच्या उत्तर रायगड महिला जिल्हाध्यक्ष विद्या तामखडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सिडकोच्या कामोठे येथील कार्यकारी अभियंता बाबूराव रामोड यांना निवेदन दिले आहे.
कामोठ्यातील गतिरोधकावर पट्टे नाहीत. त्यामुळे समोर गतिरोधक आहे हे वाहनचालकाच्या लक्षातच येत नाही, त्यामुळे छोटे मोठे अपघात होत आहेत. याचा सर्वांत जास्त त्रास हा ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना आणि त्यांच्यासोबत असणार्या लहान मुलांना होतो. त्यामुळे सिडकोच्या संबंधित विभागाकडून कामोठे शहरातील गतिरोधकांवर काळे पांढरे पट्टे लवकरात लवकर मारून द्यावे, असे तामखडे यांनी म्हटले आहे.
या संदर्भातील निवेदन देतेवेळी विद्या तामखडे यांच्यासह युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, भटके विमुक्त सेलचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष उत्तम जरग, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नानासाहेब मगदूम, उपाध्यक्ष उत्तम जाधव, महिला मोर्चा उपाध्यक्ष रश्मी भारद्वाज, सुनीता शर्मा, सामाजिक कार्यकर्ते वसंत गमरे, युवा नेते सुनील गोवारी, गणेश शिरीशकर आदी उपस्थित होते.