Breaking News

नेरळ रेल्वे स्थानकातून निर्माण नगरी जाणारा रस्ता बंद होणार? मध्य रेल्वे प्रशासनाच्या सूचना

कर्जत : बातमीदार

मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकाच्या कर्जत बाजूकडून बाहेर पडण्यासाठी दोन फुटाचा रस्ता खुला ठेवण्यात आला होता. मध्य रेल्वे कोणत्याही खासगी संस्थेला असा रस्ता देत नसताना देखील निर्माण ग्रुप ऑफ कंपनीचा बोर्ड नेरळ स्थानकात झळकत आहे. त्यामुळे हा रस्ता बंद करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या असून प्रवाशांनी पादचारी पुलाचा वापर करूनच स्थानकातून बाहेर पडावे, असा दंडक घालण्याचे आदेश नेरळ सुरक्षा दलास देण्याचे आले आहेत.

माथेरानला जाणार्‍या मिनीट्रेनमुळे जंक्शन रेल्वे स्थानक म्हणून नोंद असलेले नेरळ हे उपनगरीय रेल्वे स्थानक आहे. या स्थानकातून बाहेर लोकवस्तीत जाण्यासाठी पादचारी पूल बनविण्यात आला आहे. प्रवासी अन्य कोणत्याही मार्गाने बाहेर पडू नयेत, असा प्रयत्न रेल्वे करीत असताना, एका बिल्डरने चक्क स्वतःच्या नावाचे फलक लावून एक पायवाट प्रवाशांच्यासाठी खुली केली आहे. ही पायवाटमध्य रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करून कोणत्या अधिकारात खुली ठेवली याबद्दल प्रशासन चौकशी करीत आहे. काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नेरळ येथून माथेरानकडे जात असताना कर्जत एन्डकडील त्या पायवाटेने काही प्रवासी जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी हा काय प्रकार आहे? याची विचारणा केली गेली. त्याचवेळी मध्य रेल्वे प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी पादचारी पुलाचे काम करताना मालवाहतूक करण्यासाठी खुला केलेला फलाटाचा भाग पुन्हा बांधकाम करून बंद केला होता. त्यामुळे एका बिल्डरने लावलेल्या बोर्डमुळे सध्या प्रवासी ये – जा करीत असलेली पायवाट बंद होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे नेरळच्या पूर्व भागात असलेल्या एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाने त्या पायवाट रस्त्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती संपूर्ण जागा रेल्वेची असल्याने सुरक्षा विभागाने त्यास हरकत घेतली होती. त्यामुळे आता आलेले वरिष्ठ कार्यालयाचे निर्देश लक्षात घेता नेरळ रेल्वे स्थानकातील फलाट एकमधून बाहेर जाण्यासाठी बनविण्यात आलेली पायवाट कोणाच्या आदेशाने बनविली याचा तपास करण्याचे सूचना महाव्यवस्थापक कार्यालयाने पीडब्लूआय विभागाला दिल्या आहेत. त्याबाबत सूचना आल्यास फलाटाच्या बाहेर पडण्यासाठी असलेले अवैध मार्ग बंद करण्यात येतील अशी माहिती नेरळ स्थानकातील सुरक्षा विभागाने दिली आहे. दरम्यान, हा रस्ता बंद झाल्यास नेरळ निर्माण नगरी, गंगानागर, परिवर्तन नगर भागात राहणार्‍या रहिवाशांना पादचारी पुलाचा वापर करूनच नेरळ बाजारपेठ भागात जावे लागणार आहे.त्याहून महत्वाची बाब म्हणजे नेरळ पूर्व भागात होत असलेल्या नागरिकरणावरदेखील मोठा परिणाम होणार आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply