Breaking News

बाजारातील पडझड ही गुंतवणूक वाढविण्याची संधी

-संदीप भूशेट्टी, sbhushetty@gmail.com

शेअर बाजारात युद्धाच्या वातावरणामुळे सध्या होत असलेली घसरण ही गुंतवणूकदारांना घाबरवून टाकणारी असली तरी गुंतवणुकीला तेव्हाच चांगली फळे येतात, जेव्हा ती अशा मोठ्या चढउतारांत ताऊन सुलाखून निघते. त्यामुळे या पडझडीतही गुंतवणूकदारांनी धीर धरून गुंतवणुकीतील सातत्याला धक्का बसू देता कामा नये.

कोरोनाचे संकट कमी झाल्याने अर्थव्यवस्था रुळावर येत असतानाच रशिया आणि युक्रेनचा संघर्ष सुरू झाला आणि जगात पुन्हा अस्थिरता निर्माण झाली आहे. भारतीय शेअर बाजारातही सध्या घसरण सुरू आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा काळ असून आपल्याला काही प्रश्नाची उत्तरे स्वत:लाच द्यायची आहेत.शेअर बाजारातील सध्याची अस्थिरता पाहता पूर्वी ठरवलेली अनेक महत्त्वाची उद्दीष्टे आपण गुंतवणूक सुरूच ठेवून साध्य करणार आहोत ना? गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय आपल्या आर्थिक उद्दीष्ट पूर्ततेमध्ये मोठा अडसर निर्माण करणार नाही ना? याचा आपण निश्चितपणे विचार करणे आवश्यक आहे.

सातत्याने असणारी तेजी आणि मंदी भारतीय गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे का? गुंतवणुकदारांनी भविष्यातील ठरवलेल्या आर्थिक उद्दीष्टांसाठी केलेली गुंतवणूक अशा चढउतारांमुळे आपल्या उद्दीष्टांपर्यंत पोहचू शकेल का? या सर्वांसाठी आपण निश्चित विचार करणे गरजेचे आहे. बाजारातील चढउतार भविष्यातील उद्दीष्ट गाठण्यासाठी निश्चित मदत करत असतो, परंतु या बाजारातील दोलायमान स्थितीत प्रत्येक गुंतवणूकदाराने अत्यंत शांतपणे आपली गुंतवणूक सुरूच ठेवणे आवश्यक असते. सिस्टिमॅटिक इन्व्हस्टमेंट प्लॅन (एसआयपी), सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (एसटीपी) व एकरकमी गुंतवणूक हे पर्याय निश्चित योग्य ठरतील.

शेअर बाजारात सध्या होत असणारी पडझड प्रत्येक गुंतवणूकदारास पुन्हा गुंतवणूक वाढवण्याची उत्तम संधी देत आहे. या बाजारातील चढउतारांमुळे गुंतवणूकदाराने घाबरून जाऊन आपल्या उद्दीष्टांसाठी केलेली एसआयपी अथवा एकरकमी गुंतवणूक मध्येच काढून घेऊ नये किंवा थांबवू नये. असे करणे अत्यंत चुकीचे ठरू शकते. आपण काही उद्दीष्टे भविष्याच्या दृष्टीने ठरवत असतो. उदाहरणार्थ – मुलांच्या उच्च शिक्षणासाठीचा खर्च, मुलांच्या लग्नासाठीचा खर्च, निवृत्तीसाठीचे नियोजन, घरबांधणीसाठी खर्च, परदेश प्रवास अशी विविध उद्दीष्टे आपण गुंतवणूक करताना ठरवलेली असतात. या उद्दीष्टांसाठी लागणारा वेळ व अंदाजे खर्च हा गुंतवणुकीअगोदरच काढला जातो. यालाच आपण गुंतवणुकीचे नियोजन असे म्हणतो. नियोजन पूर्ण झाल्यावर उद्दीष्ट पूर्ततेसाठी योग्य गुंतवणूक पर्याय निवडणे हे महत्त्वाचे ठरते. गुंतवणुकीस सुरुवात झाल्यावर सध्या ज्या प्रकारे शेअर बाजाराचा प्रवास सुरू आहे ते पाहता आपण ठरवलेली उद्दीष्टे काही काळासाठी विसरून जातो व वेगवेगळ्या नकारात्मक बातम्यांमुळे गुंतवणूकदार गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत असतो.

शेअर बाजाराच्या या संक्रमण काळात मोठ्या धैर्याने आपली गुंतवणूक सुरुच ठेवणे आवश्यक आहे. आपल्या आर्थिक सल्लागारच्या मदतीने घडलेल्या व घडत असलेल्या घटनांचा योग्य अर्थ व परामर्श घेणे आवश्यक आहे. गरज पडल्यास गुंतवणुकीच्या पर्यायांचा पुनर्विचार करता येऊ शकतो व आवश्यक वाटल्यास काही बदलही करता येतील, परंतु पूर्णपणे गुंतवणूक थांबवणे किंवा काढून घेणे हे आपल्या उद्दीष्टांसाठी मारक ठरते.

उदाहरणार्थ – आजपासून 15 वर्षानंतर मुलाच्या उच्च शिक्षणसाठी 50 लाख रुपयांची आवश्यकता आहे आणि त्यासाठी दहा हजार रुपयांची एसआयपी करण्याचे ठरवले आहे आणि 12 टक्के चक्रवाढ व्याजदराने मिळणारी रक्कम 50,46,000 रुपये 15 वर्षानंतर निर्माण होणार आहे, परंतु जर आपण आपली गुंतवणूक बाजारातील चढउतारांमुळे बदलल्यास नवीन गुंतवणुकीमध्ये 12 टक्के चक्रवाढ व्याजदराऐवजी आठ टक्के व्याजदर मिळाला तर 15 वर्षांनंतर मिळणारी रक्कम 34,83,000 रुपये असणार आहे आणि यामुळे आपले उद्दीष्ट पूर्ण होणार नाही.

यामुळेच प्रत्येक गुंतवणूकदाराने आपल्या गुंतवणुकीचे नियोजन अतिशय विचारपूर्वक केले पाहिजे. हे करत असताना आपली उद्दीष्टे कोणती आहेत याचा प्राधान्यक्रम निश्चित करावा, उद्दीष्टे पूर्ण करण्याचा कालावधीही ठरवावा, अंदाजे उद्दीष्टांसाठी किती रक्कम लागणार आहे याचीही चाचपणी करावी. या संपूर्ण गुंतवणूक प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य गुंतवणूक पर्यायाची निवड.

हे करत असतानाच या गुंतवणूक प्रकारात ठरवलेल्या कालावधीपर्यंत गुंतवणूक सुरूच ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. प्रत्येक गुंतवणुकीचे नियोजन करताना काही आराखडे व अनुभव लक्षात घेतला जातो, परंतु बाजारातील चढउतार पाहता आपण गृहित धरलेले आराखडे अनेकदा चुकू शकतात. यासाठी वेळोवेळी आपल्या नियोजनाचा आढावा घ्यावा.

बाजारातील चढउतार आपल्या गुतंवणुकीस मागे ढकलण्याचे अथवा जोरात पुढे सरकवण्याचे काम करत असते. ज्यावेळी गुंतवणुकीचे मूल्य कमी होते त्यावेळी गुंतवणुकीमध्ये शक्य झाल्यास वृद्धी करत राहावी म्हणजे बाजारात ज्यावेळी मोठी वाढ होते त्यावेळी एकूण गुंतवणुकीत वेगाने उद्दीष्टांच्या रकमेपर्यंत वेळेच्या आधी पोहचणे शक्य होते.

आपल्या उद्दीष्टांप्रमाणे योग्य गुंतवणूक करा. शेअर बाजाराच्या चढउताराचा फायदा घ्यायचा असेल तर नियोजन उत्तम हवे. म्युच्युअल फंडांच्या योजना निवडतानाही योग्य खबरदारी घ्या. योजनांच्या पराताव्या काळानुसार बदल होत असतो. कोणताही एक प्रकार दुसर्‍यापेक्षा चांगला आहे, असे सिद्ध होत नाही. प्रत्येकाचा परतावा काळानुसार बदलत जातो. म्युच्युअल फंडामध्ये मोठ्या कंपन्यांमध्ये (लार्ज कॅप), मध्यम कंपन्यामध्ये (मिड कॅप) व छोट्या कंपन्यांमध्ये (स्मॉल कॅप) गुंतवणूक केली जाते. परंतु यातही काळानुसार परतावा बदलत जातो. गेल्या दहा वर्षांत गुंतवणुकदारांना मिळालेला परतावा पुढीलप्रमाणे आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply