भाद्रपद महिन्यात साजरा होणारा गणेशोत्सव आणि फाल्गुन महिन्यात साजरा होणारा होळीचा सण या दोनही सणांचे कोकणात किती महत्व आहे हे नव्याने सांगायला नको. मात्र यंदा कोरोनाच्या भीतीचे सावट ओसरल्यामुळे मागील दोन वर्षांची कसर भरून काढायला होळकरी सज्ज आहेत. परिणामी प्रत्येक कोकणवासीय होळीला गावी जाण्यासाठी उत्सुक आहे.
होळी… वाईट प्रवृत्तीचे थोडक्यात वाईटाचे दहन करून चांगले आत्मसात करण्याचा संस्कार हा होळीचा सण आपल्याला देतो. प्रत्येक गावची होळी साजरी करण्याची परंपरा, पद्धत वेगळी आहे. काही गावात होळीचे प्रतीक म्हणून वेगवेगळ्या वृक्षांची पूजा केली जाते. त्यात केळी, आंबा, सावर, नारळ यांना प्राधान्य असते. गावाची, आळीची, वाडीची अशी वेगळी होळी साजरी करण्याची प्रथा वाढीस लागली आहे. पूर्वी गावची एकच होळी साजरी होत होती. परन्तु वाढती वस्ती आणि बदलत्या पिढी सोबत होळीचा सण देखील साजरा करण्याची पद्धत बदलत गेली.
होळीच्या सणाला खर्या अर्थाने 10-15 दिवस आधीपासूनच सुरुवात होते. या दिवसात लहान -लहान होळ्या लावून त्यांचे पूजन करून त्या दहन करण्यात येतात. काही वर्षे मागे गेल्यास गावागावात माळरानावर होळीच्या निमित्ताने लोकगीतांचे स्वर कानावर पडत होते. एका विशिष्ट लयीमध्ये आणि विशिष्ट तालावर महिला पारंपरिक गीत गाऊन त्या नऊ रात्री साजर्या करीत. प्रत्येक गावात गायिली जाणारी ही होळीची गाणी एकाच चालीवर होती. कालांतराने सण साजरा करण्याची परंपरा बदलत गेली. तळकोकणात साजरी होणारी होळी आणि अन्यत्र साजरी होणारी होळी यात निश्चित फरक जाणवतो. विशेषतः रायगडात जे तालुके मुंबईजवळ आहेत त्या तालुक्यात होळीपेक्षा धुळवड अधिक जोमाने साजरी होते. तरुणाई रंग दे गुलाल मोहें… च्या तालावर ठेका धरण्यात अधिक उत्सुक असल्याचे पहायला मिळते. मात्र हा बदल जाणवत असला तरी, आजही जुन्या पिढीने होळीची जुनी परंपरा कायम ठेवली आहे. रायगडात अलिबाग, महाड, माणगाव,श्रीवर्धन, म्हसळा, बोर्ली- पंचतन, कर्जत, पेण तालुक्यातील होळी, परंपरा राखून साजरी केली जाते. यात पारंपरिक खेळ, सोंग, पालखी मिरवणूक, पालखी नाचवणे या प्रथा शाबूत आहेत.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण- उत्सव साजरे झाले नव्हते. कोणी भीती बाळगून तर कोणी भीती झुगारून सण साजरे केले. परन्तु या वर्षी कोरोना आटोक्यात आल्याने निर्बंध शिथिल झाल्याने होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
परन्तु होळी गुरुवारी आल्याने चाकरमानीनचा थोडा हिरमोड झाला आहे. शुक्रवारी धुळवड आणि पुढे शनिवार, रविवार आल्याने पर्यटन स्थळे गर्दीने फुलणार आहेत. होळीच्या सणाला आता केवळ दोन दिवस राहिले आहेत, त्यामुळे प्रत्येकाला या दिवसाची प्रतीक्षा आहे.
मुरुडमध्ये बोटी किनार्यावर
होळी हा सण कोळी बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. होळी सण जवळ आला की, प्रथम होड्यांना रंगीबेरंगी पट्यांनी सजवल्या जाते. झूल झालर, वेगवेगळ्या रंगांचे झेंडे लावले जातात. त्यासाठी मुरूड परिसरातील सुमारे सातशेपेक्षा जास्त होड्या किनार्याला आल्या आहेत. त्यामुळे सध्या मुरूड किनार्यावर मोठ्या संख्येने बोटी पहावयास मिळत मिळत आहेत. दहा ते बारा दिवस गावात होळी साजरी करून या बोटी पुन्हा मच्छिमारीसाठी रवाना होतात.
अलिबागजवळील समुद्रातील खांदेरी किल्ल्यात वेताळ देवाचे मंदिर आहे. वेताळ देव हे कोळी समाजाचे श्रध्दा स्थान आहे. होळीसाठी घरी परतणार्या मच्छिमारांच्या होड्या खांदेरी किल्ल्यावरील वेताळ देवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने जातात. या देवाला मनाचा नारळ, पुष्पहार, श्रीफळ, पेढे, तसेच मानाचा कोंबडा अर्पण केला जातो.
-प्रकाश सोनवडेकर, संजय करडे