Breaking News

आपण ‘डेनिस डिडरोट इफेक्ट’च्या  प्रभावाखाली तर नाही ना?

वस्तू कितीही चांगली असली; तरी तिचा आपल्या उपयोगितेशी व आनंदाशी काही संबंध असतोच, असे नाही किंवा तो आनंद क्षणिक असतो. कालांतराने तो आनंदही संपतो आणि पैसेही जातात. त्याला म्हणतात ‘डेनिस डिडरोट इफेक्ट’. त्याच्या प्रभावाखाली आपण नाही ना, याचा विचार केलाच पाहिजे. म्हणून या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे, पण त्यासाठी स्वतःच प्रयत्न करावा लागतो.

रशियात डेनिस डिडरोट नावाचा एक फ्रेंच तत्त्वज्ञानी होता. त्यानं खूप ग्रंथ वाचले होते. त्याचं स्वतःचं असं मोठं ग्रंथालय होतं. त्याचं संपूर्ण आयुष्य वाचनात, पण गरिबीत गेलं आणि मुलीच्या लग्नासाठी सुद्धा त्याच्याकडं पैसे नव्हते, इतका तो गरीब होता. त्या वेळी रशियाची राणी कँथरीनला डेनिस डिडरोटच्या गरिबीबद्दल कळलं आणि तिनं डिडरोटला त्याच्याकडील लायब्ररी विकत घेण्यासाठी 1000 ग्रेट ब्रिटन पौंड म्हणजेच 50 हजार डॉलर्स (आजचे जवळपास साडेतीन कोटी रुपये) देऊ केले. अशाप्रकारे डेनिस डिडरोट एका दिवसात खूप श्रीमंत झाला. त्यानं त्या पैशातून लगेच ‘स्कार्लेट रॉब’, म्हणजे एक उच्च प्रतीचा व महाग असा पोषाख खरेदी केला. हा पोशाख वापरत असताना त्याला वाटलं की; आपण उच्च प्रतीचा पोषाख घालतोय परंतु आपल्या घरात मात्र तशा उच्चप्रतीच्या वस्तू नाहीत. मग त्यानं हळूहळू घरातल्या वस्तू बदलल्या. किचन रूममधल्या वस्तू बदलल्या. फर्निचर बदललं, सगळं काही नवं नवं घेतलं. आता त्याचं संपूर्ण घर आणि पोषाख दोन्हीही शोभून दिसत होतं, परंतु हे सगळं केल्यानं तो पुन्हा कंगाल झाला आणि कर्जही वाढत गेलं. मोठ्या दुःखानं डेनिस डिडरोटनं हे सहन केलं आणि मग त्यानं हे सगळे अनुभव आपल्या एका निबंधात लिहून ठेवले. यालाच मानस शास्त्रातील ‘डिडरोट इफेक्ट’ (ऊळवशीेीं एषषशलीं) म्हणतात.Diderot Effect) म्हणतात.

मोठे उद्योजक, व्यापारी, ट्रेडर्स, डेव्हलपर्स, पुढारी सुद्धा; या इफेक्टचा छुप्या पद्धतीनं, अनावधानानं अवलंब करतात. याचे निरीक्षण आपण करून पहाण्यास हरकत नाही. या आधीच्या लेखात देखील ही गोष्ट मी उल्लेखली होतीच की कोणत्याही भव्य मॉलमध्ये खाली-वर जाण्यासाठी एस्कलेटर्स हे एकाखाली एक नसून विरुद्ध टोकाच्या दिशेला असतात जेणेकरून ग्राहक या टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत आपसूकच जातो व जाताना अनेक दालनं टेहाळतो. अगदी त्याचप्रमाणं डी-मार्टमध्ये सुद्धा एंट्रन्स समोर लेटेस्ट ऑफर्स मांडलेल्या असतात आणि बिलिंग काउंटर भोवती मुलांना आकर्षित करणार्‍या गोष्टी, खास करून चॉकलेट्स असतात. कारण सहज आहे की बिल करताना भली मोठी रांग असल्यानं लहान मुलं कंटाळतात आणि ती त्या गोष्टी मागतात आणि त्यांना त्या नाइलाजानं दिल्या जातात (मानसिकता).

समजा आपण महागडी गाडी घेतली तर  मग आपण गाडीला शोभेसे कपडे, शूज घेतो, त्याला साजेसं घड्याळ, पेन, गॉगल इ. घेतोच.

घरात मोठा टीव्ही आणला की लगेचच एचडी वाहिन्या सुरू करणार, चांगलं टेबल, फर्निचर, मग घराला नवा रंग लावला जाणार आणि त्याला मॅचिंग पडदे लावून सजावट करणार.

समजा आपण 50 हजार/एक लाखाचा मोबाईल घेतला तरी आपल्याला आणखी काहीतरी कमी आहे असं वाटतं आणि मग अजून मोबाईलला महागडा गोरील्ला ग्लास लावली जाते, 500 रुपयांचं जुनं कव्हर बदललं जातं. मोबाईलला शंभर रुपयांचा हेडफोन चालला असता; पण अडीच-तीन हजाराचा हेडफोन घेतला जातो. कारण लाखाच्या मोबाईलला स्वस्त वस्तू शोभून दिसत नाहीत. हे सर्व कशासाठी? इतरांवर इंप्रेशन मारण्यासाठी अथवा स्टेटस वाढवण्यासाठी आणि वाढवलेलं स्टेटस जपण्यासाठी..  यालाच म्हणतात, ‘डिडरोट इफेक्ट’. 

थोडक्यात सांगायचं तर; एक नवीन वस्तू विकत घेतली की; तिच्यामुळे दुसर्‍या वस्तूचा दर्जा आपोआपच कमी होतो (तसं वाटतं) आणि तो वाढविण्यासाठी आपण आणखी जास्त खर्च करीत जातो. त्याचप्रकारानं मॉलमध्ये आपण एक वस्तू घ्यायला गेलो की दुसर्‍या वस्तू आपोआपच बघितल्या जातात आणि आपण त्या गरज नसली तरी घेतो. अशा पद्धतीनं आपण एक एक वस्तू घेऊन अनेक अनावश्यक किंवा फारशा महत्त्वाच्या नसणार्‍या वस्तू घेत असतो आणि ते आपणांस कळत सुद्धा नाही. यालाच ‘spiraling consumption’ म्हणतात. ही सामान्य मानवी प्रवृत्ती (human tendency) आहे. या प्रवृत्तीचे परिणाम भयानक होत असतात; पण ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. आपण नकळतपणे अनावश्यक खर्च करत जातो मात्र काही लोकांच्या हे लक्षात येतं, परंतु त्याकडं गांभीर्यानं पाहिलं जात नाही. तर काहींच्या खूप उशिरा लक्षात येतं आणि अनेकांच्या हे लक्षातच येत नाही. म्हणून ते खूप खर्च करीत जातात. माणसाला खर्च करताना भीती वाटत नाही; पण नंतर हिशोब लागत नाही; तेव्हा त्याचा त्रास होतो. म्हणून कोणतीही वस्तू खरेदी करताना; या वस्तूची मला कितपत गरज आहे? असा स्वतःच स्वतःला प्रश्न विचारावा. विचार करून त्याचं उत्तर खरंच जर होय आलं तरच ती वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा. असा निर्णय घेतल्यावर त्या वस्तूचा दर्जा आणि किंमत वाजवी आहे कां (worthiness and value for money)? याचा विचार करून मिळेल त्या किंमतीत न घेता ती वाजवी किंमतीत घेण्याचा प्रयत्न करावा. कारण दुकानदार एक वस्तू समोर ठेवतो; लगेच तो दुसरी वस्तू दाखवून संभ्रम निर्माण करतो. तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की; ती वस्तू कितीही चांगली असली; तरी तिचा आपल्या उपयोगितेशी व आनंदाशी काही संबंध नसतो. तो आनंद क्षणिक असतो. कालांतराने तो आनंदही संपतो आणि पैसेही जातात. म्हणून या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे, पण त्यासाठी स्वतःच प्रयत्न करावा लागतो.

मी मानसशास्त्रज्ञ किंवा तत्त्वज्ञानी नाही, परंतु आम्ही ज्या ध्येयांचा पाठपुरावा करतो, त्या गोष्टींचा विचार करण्यात मी बराच वेळ घालवला आहे. आम्ही आमच्या गरजेपेक्षा जास्त सामग्री खरेदी करतो अशी अनेक कारणे आहेत, आजूबाजूच्या वातावरणातून काही उत्प्रेरणा आपल्यावर लादल्या जातात व इतर कारणं आपल्या स्वतःच्या अंतर्गत प्रेरणांमधून उद्भवतात आणि त्यासाठी अनेकदा वायफळ खर्च केला जातो. कोणत्याही प्रकारे, आपण जे काही करतो ते आपण का विकत घेतो याची समज असणं हा एक योग्य प्रयत्न आहे. मला डिडरोट इफेक्ट आणि त्याचा ग्राहकोपयोगी वस्तूंशी संबंध इतका मनोरंजक वाटला की डेनिस डिडरोट नावाच्या फ्रेंच तत्त्ववेत्त्यानं 18 व्या शतकात मूळतः नोंदवलेली अतिउपभोगाची ही प्रेरणा आपल्यामध्ये अजूनही सामान्यपणे आढळणारी बाब आहे हे लक्षात येते.

डिडेरोट इफेक्टचे सर्वात सोपं वर्णन म्हणजे, खिशात पैसा खुळखुळू लागला की आपल्यातील उपभोग घेण्याची मानसिकता उफाळून येते आणि बर्‍याचदा याचं पर्यवसान चंगळवादाकडं जातं. नुकतंच गेल्या वर्षी आमच्या घराचं रिनोव्हेशन झालं, म्हणजे केवळ करायचं म्हणून सुशोभीकरण नव्हे, तर सोयीसाठी दोन फ्लॅट्सचा एक फ्लॅट केला गेला परंतु त्यामागोमाग नवीन सोफा सेट्स, कुशन्स, स्पेशल लाईट्स, त्यास साजेशी कार्पेट्स, चिमणी, टीव्ही, फ्रिज, मायक्रोवेव्ह, ओटीजी, मग त्यासाठी वेगळी भांडी, नवीन डिनरसेट, क्रोकरी हे आपसूकच घेतलं गेलं. गरजेची गोष्ट खरंतर घर बनवणं ही होती परंतु त्यामुळं पुढील खर्चाची इच्छा निर्माण झाली जे एक माणूस कसा अडकत जातो, याचेउदाहरण आहे. अशाप्रकारे, हा Diderot Effect आमच्या ग्राहकांच्या खरेदीवर कसा प्रभाव पाडतो हे उत्तम प्रकारे स्पष्ट करते. आपल्या फिक्शनमध्ये डिडरोट लिहितात की त्यांच्या उच्च रॉबनंतर अनेक गोष्टी गरज नसतानाही बदलल्या जातात. कथेच्या शेवटी, ते लिहितात मी माझ्या जुन्या ड्रेसिंग गाऊनचा पूर्ण मालक होतो, परंतु आता मी माझ्या नवीन गोष्टींचा गुलाम झालो आहे. म्हणूनच, एका खरेदीमुळं अधिक, अनियोजित खरेदी कशी होते याची मेख समजून घेतल्यानंतरच तुम्ही त्याचं (दुष्ट)चक्र खंडित करू शकाल.

हीच गोष्ट नवीन घर व गाडी घेतानाही. घराची गरज असताना घर घेणं आवश्यक आहे, परंतु केवळ गुंतवणूक म्हणून किंवा अमूक एक एरियात फ्लॅट असावा म्हणून स्टेटस वाढवण्यासाठी लोक 2-4 घरं घेऊन ठेवतात. परवाच माझ्या मित्रानं अव्वाच्या सव्वा लोन करून पेंट हाऊस खरेदी केलं, यावरून एक ब्रिटिश म्हण आठवली Fools build houses, and wise men live in them या बाबतीत पुढच्या लेखात. कारच्या बाबतीत अगदी माझीच गोष्ट सांगतो, गेले वर्षभर माझा विचार होता की (15 वर्षे) जुनी गाडी विकून नवीन घ्यावी, परंतु माझ्यातील गुंतवणूकदार जागा झाला आणि मी काही गणितं मांडली,

1) गाडीचा वापर किती होऊ शकतो (नव्याची नवलाई सोडून)? तर केवळ महिन्यातून एखाद्या वेळेस दोन दिवसांची सुटी घालवायला शहराबाहेर गेल्यास 300 किमी अन्यथा गाडी पडून राहणार. मग सुटीचं प्लॅनिंग म्हणजे हॉटेलिंग, खाणं पिणं, शॉपिंग असे इतर खर्च आलेच, ते वेगळे, (परत डिडरोट इफेक्ट-म्हणजे गाडी पडून राहायला नको म्हणून उगाचच वापर करायचा).

2) गाडीचं मूल्य रोज कमीच होणार (डेप्रीशिएटिंग ऍसेट).

3) गाडीचा मेंटेनन्स व पेट्रोल खर्च निराळा.

4) गाडीची गरज ही सध्याच्या गाडीद्वारे देखील भागवता येऊ शकते.

आणि मग माझ्या मताला पुष्टी देण्यासाठी -गुंतवणूक गुरू, वॉरेन बफे हे अजून त्यांची जुनीच कॅडिलॅक गाडी वापरतात, हे लक्षात आलं.

त्यामुळे माझी नवीन गाडी अगदी 10 हजारांत चकाचक करून घेतली आणि ग्रीन टॅक्स मिळून अजून काही हजार मोजून पुढील 4-5 वर्षांसाठी गाडी तयार झाली. त्यामुळे पुढील 4-5 वर्षांसाठी निव्वळ गुंतवणूक 50 हजारांच्या आतच जी नवीन गाडीसाठी कमीत कमी 6-7 लाखांवर गेली असती आणि त्यावरील व्याज धरून 10च्या आसपास. असो, अशाच प्रकारे आपल्या जीवनात डिडरोट इफेक्ट टाळण्यासाठी अजून काही महत्त्वाच्या गोष्टी-

1. डिडरोट टाळण्यासाठी तो होत आहे का ते तपासा.    

2. भावनांवर ताबा ठेवा.

3. गरज नसलेल्या चैनीच्या गोष्टींना नाही म्हणायला आणि समजवायला शिका.

4. खुळखुळता जास्तीचा पैसा सर्वांत आधी गुंतवा, खर्च झाल्यानंतर उरलेला पैसा नको.

5. स्वतःला आठवण करून द्या की संपत्ती तुमची अथवा तुमच्या यशाची व्याख्या करत नाही आणि जीवनाची विपुलता आपल्या मालकीच्या वस्तूंमध्ये आढळत नाही.

6. कोणतीही गोष्ट तिच्या उपयोगीतेसाठी योग्य मूल्यामध्ये खरेदी करा, ना की दिखाव्यासाठी.

-प्रसाद ल. भावे(9822075888), sharpfinvest@gmail.com

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply