खोपोली : प्रतिनिधी
येथील स्वामी विवेकानंद विद्यालय येथे यंदाची दहावीची परीक्षा होणार असून, पन्नास वर्षांपेक्षा अधिककाळाच्या प्रतीक्षेनंतर खालापूरात परीक्षा केंद्र मिळाले आहे.
खालापूर हे तालुक्याचे ठिकाण असून, शहरात स्वामी विवेकानंद विद्यालय ही पन्नास वर्षे जुनी शाळा आहे. तेथे ग्रामीण भागातील, खेडोपाड्यातील मुले शिक्षणासाठी येतात. या शाळेची पटसंख्या सहाशेच्या तर दहावी इयत्तेतील विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 80च्या घरात आहे. मात्र या ठिकाणी दहावीचे परीक्षा केंद्र नाही, ते खोपोलीला आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांची फरफट होत होती. खोपोलीला जाण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांंचे दोन ते तीन तास वाया जात असत. परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचण्यासाठी खात्रीचे वाहतूक साधन नसल्याने विद्यार्थी आणि पालक यांची धावपळ होत असे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथे केंद्र असा निर्णय परीक्षा मंडळाने घतेला आहे. त्याचा फायदा मुख्यत्वे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे पन्नास वर्षांपेक्षा अधिककाळाच्या प्रतीक्षेनंतर दहावीचे 80 विद्यार्थी असलेल्या खालापूर शहरातील स्वामी विवेकानंद विद्यालयाला दहावीचे परीक्षा केंद्र मिळाले आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना कोरोना पावला असे वाटत असून, त्यांचा ताण काहीसा कमी झाला आहे.
खालापूर शाळेत कायमस्वरूपी दहावीचे परीक्षा केंद्र व्हावे, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रासाठी आवश्यक अटी व नियम याची पूर्तता करण्यासाठी शाळा प्रशासन, आम्ही माजी विद्यार्थी सर्वतोपरी सहकार्य करू.
-प्रसाद लिमये, माजी विद्यार्थी, खालापूर