रोहे : प्रतिनिधी
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखत सर्व सण निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली रोहा शहरात रुटमार्च करण्यात आला. यामध्ये सर्व सहाय्यक अधिकारी आणि 30 कर्मचार्यांसह अग्निशमन, रुग्णवाहिका यांचा सहभाग होता.
रोहा शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात पोलीस यंत्रणा गणपती आगमन व विसर्जन यासह अन्य वेळी गर्दी होणार नाही यासाठी दक्षपणे कर्तव्य बजावत आहेत. पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येस सोशल मीडियाच्या माध्यमातून नियमांचे पालन करीत सणउत्सव साजरे करण्याचे आवाहन केले. त्यानंतर रविवारी सकाळी शहरात रुटमार्च काढत नागरिकांमध्ये नियमांबाबत जागृती केली. रोहा बसस्थानक येथून या रुटमार्चची सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांसह चार शासकीय वाहनांचा समावेश होता. मुख्य बाजारपेठ, काकासाहेब गांगल मार्ग, मेहेंदळे हायस्कूल, नाना शंकरशेट मार्ग, दमखाडी, नगर परिषद कार्यालय या मार्गावर हा रुटमार्च करण्यात आला.