तक्का गावातील पारंपरिक होळी ठरली आकर्षण
पनवेल परिसरात अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने त्याचप्रमाणे विविध सामाजिक उपक्रम राबवून होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत दोन ते पाच दिवस होळी साजरी करण्यात येते. तक्का गावातील होळी इतर होळींपेक्षा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने रचली जाते. ही होळी दरवर्षीच परिसरात आकर्षणाचा विषय ठरते.
पनवेल ः रामप्रहर वृत्त
तक्का गावातील होळीची पूजा मात्र एखाद्या झोपडीत बसून पूजा करावी, तशी करता येते. तक्का गावातील होळी इतर होळींपेक्षा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने रचली जाते. याठिकाणी होळी एखाद्या छोट्या झोपडीसारखी असते. होळीच्या आतमध्ये बसून तिची पूजा केली जाते. रात्री होळी लावण्यापूर्वी काही वेळ आधी या झोपडीत लाकडे रचून ती बंद केली जाते. मग होळी लावण्यात येते. ही प्रथा अनेक वर्षे सुरू असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.
रोटरी क्लबतर्फे विविध उपक्रम
रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर आणि डॉ. एनएमजे दिव्यांग शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेमध्ये एक आगळी-वेगळी होळी साजरी करण्यात आली. या प्रसंगी रो. अलका कोळी तोडणकर, रो. पुरनसिंग मेहरा, रो. स्नेहल पेंडसे तसेच शाळेतील मुख्यधापाक, शिक्षक, विध्यार्थी आणि पालक मोठया संख्येने उपस्थित होते.तसेच रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर व पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या वतीने नवीन पनवेल येथील शाळेमध्ये जाऊन कृत्रिम पद्धतीने रंग कसे तयार करावे, याचे प्रशिक्षण मुलांना व पालकांना देण्यात आले. त्याचप्रमाणे महिलाना स्वयंरोजगार म्हणून रो. अलका कोळी यांनी गोधडी प्रशिक्षण दिले व घरात बसून महिलांनी दिवा किंवा समईतील वात कशी बनवावी याचे प्रशिक्षण रो. स्नेहल पेंडसे यांनी दिले, या प्रसंगी रो. पुरनसिंग मेहरा, शिक्षक, विध्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘एक पोळी होळीची भुकेलेल्या मुखाची’
यशस्विनी सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक महिला मंडळाच्या वतीने भानघर येथील करुणेश्वर वृद्धाश्रम येथे जाऊन वाटप् केल्या. तसेच वृद्धांना शिधा, बिस्किट तसेच मास्क वाटप करण्यात आले. या वेळी यशस्विनी महिला मंडळातर्फे संस्थापक अध्यक्षा पल्लवी हर्षवर्धन पाटील, सचिव कल्पना जाधव तसेच खजिनदार सुनीता शर्मा उपस्थित होत्या.
‘संकल्प’ मुळे लहानग्यांच्या चेहर्यावर हसू
होळी सणासाठी सर्वच ठिकणी नैवेद्य म्हणून पुरणपोळी अर्पण करण्याची प्रथा आहे. मात्र ही पुरणपोळी होळीमध्ये अर्पण न करता, ती एखाद्या गरजू व्यक्तीला दिल्यास त्यांचे आर्शीवाद तर आपल्याला लाभतातच. शिवाय मानसिक समाधानही मिळते. याच उद्देशाने कामोठे करंजाडे येथील संकल्प फाउंडेशनतर्फे गुरुवारी (दि. 17) ओपन एज्युकेशनमधील मुलांना पुरणपोळी व कुरडई, करंजी, अनारसांचे वाटप केले. या वेळी अध्यक्षा वैशाली जगदाळे, कुंडेवहाळ गावातील सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.