अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा सामाजिक बहिष्काराने डोके वर काढले आहे. पेण तालुक्यातील पाटणोली ग्रामपंचायत हद्दीतील नवघर कोळीवाडा येथील चार कुटुंबीयांना वाळीत टाकण्यात आले आहे. त्यांनी न्यायासाठी रायगडच्या जिल्हाधिकार्यांना साकडे घातले असून शुक्रवारी (दि. 12) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. एप्रिल 2021मध्ये कोरोना महामारीमुळे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम करण्यास शासनान बंदी घातली होती. तरीही नवघर कोळीवाड्यात हनुमान जयंतीला मिरवणूक काढण्यात आली. याची माहिती पोलिसांना मिळाल्याने मिरवणूक काढणार्यांवर पोलिसांनी कारवाई केली. गावात मिरवणूक काढल्याची माहिती दत्तात्रेय भवान्या कोळी यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांनी पोलिसांना दिली असल्याच्या संशयातून गावकीच्या पंचांनी दत्तात्रेय कोळी यांचे कुटूंब तसेच त्यांच्या नात्यातील इतर दोन कुटूंब अशा एकूण तीन कुटूंबांना वाळीत टाकले. या कुटुंंबांतील सदस्यांशी कोणताही व्यवहार करणार्या व्यक्तीकडून 30 हजार रुपये दंड घेण्याचे फर्मान काढले. मे महिन्यापासून या तीन कुटुंबांना वाळीत टाकण्यात आले असून गावातील इतर लोकांनी त्यांच्याशी संपर्क तोडला आहे. या संदर्भात 23 जून रोजी पेण उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दोन्ही बाजूकडील लोकांची बैठक घेतली आणि सामोपचाराने प्रकरण मिटविण्यास सांगितले, मात्र पंचांनी बहिष्कार मागे घेतला नाही. त्यामुळे या प्रकरणात न्याय मिळविण्यासाठी वाळीत कुटुंबांनी रायगडच्या जिल्हाधिकार्यांना साकडे घातले. दत्तात्रेय भवान्या कोळी, गजानन मारुती कोळी, अशोक पांडुरंग कोळी, देवेंद्र मारुती कोळी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, रेशनिंग भ्रष्टाचार उघड होऊ नये यासाठी वाळीत टाकल्याचा कांगावा केला जात असून स्वत:च्या स्वार्थासाठी गावाला बदनाम केले जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.