टी-10 मालिकेत अवघ्या 25 चेंडूंत ठोकले शतक
दुबई : वृत्तसंस्था
इंग्लंडचा उगवता तारा विल जॅक्स याने अवघ्या 25 चेंडूंत शतक झळकावण्याचा विक्रम रचला आहे. दुबईत सुरू असलेल्या टी-10 तिरंगी मालिकेत जॅक्सने हा पराक्रम केला.
भारतात आयपीएलची धूम सुरू होणार आहे. यानिमित्ताने चौकार-षटकारांची आतषबाजी करण्यासाठी रथी-महारथी सज्ज झाले आहेत. तत्पूर्वी, दुबईत टी-10 तिरंगी मालिकेत इंग्लंडचा सरे काऊंटी क्रिकेट क्लब आणि लँकशायर क्रिकेट क्लब आमनेसामने उभे ठाकले होते. या सामन्यात सरे क्लबच्या विल जॅक्सने तुफान फटकेबाजी केली. 30 चेंडूंत 105 धावांची खेळी करताना त्याने 11 षटकार आणि 8 चौकार तडकावले. 25 चेंडूंतच त्याने आपले शतक साजरे केले.
व्यावसायिक क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या फलंदाजाने झळकावलेले हे सर्वात वेगवान शतक मानले जात आहे. लँकशायरचा गोलंदाज स्टीफन पेरी याच्या एका ओव्हरमध्ये विल जॅक्सने सहा चेंडूंत सहा षटकार ठोकण्याचा पराक्रमही या सामन्यात गाजविला. पेरी इंग्लंडकडून वनडे आणि टी-20 क्रिकेट खेळला आहे.
विल जॅक्स 20 वर्षांचा असून, फेब्रुवारी महिन्यात तो इंग्लंड लायन्स संघाकडून भारत अ संघाविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. त्यात त्याने 63 धावांची खेळी केली होती.
सहा चेंडूंत सहा षटकार
इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघाचा माजी खेळाडू विल जॅक्सने सलामीला येताना प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई केली. त्याने स्टीफन पॅरीच्या एका षटकात सहा षटकार खेचले. 98 धावांवर असताना तो थोडक्यात बचावला. त्यानंतर त्याने शतक साजरे केले. त्यामुळे सरे क्लबने 10 षटकांत 3 बाद 176 धावा केल्या. यानंतर लँकेशायरचा संपूर्ण संघ 9.3 षटकांत 81 धावांवर तंबूत परतला.
वेगवान अर्धशतक अन् शतक
विल जेक्सने त्याने 30 चेंडूंत 105 धावांची खेळी केली. तत्पूर्वी अर्धशतक 14 चेंडूंमध्ये पूर्ण केले. या सामन्याला अधिकृत दर्जा नव्हता. जर सामन्याला अधिकृत दर्जा प्राप्त असता तर क्रिकेट विश्वातील सर्वाधिक वेगवान शतक म्हणून जेक्सच्या या खेळीची नोंद झाली असती. आयपीएलमध्ये वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने 2013मध्ये केवळ 30 चेंडूंमध्ये वेगवान शतक ठोकले होते. तो एक विक्रम आहे.