Breaking News

24 जूनला एक लाख प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार

काळा दिन रास्ता रोको आंदोलनात सिडकोच्या नावाने शिमगा

पनवेल ः हरेश साठे

येत्या 24 जूनला एक लाख प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार आहेत. त्यामुळे सिडको आणि राज्य सरकारच्या विरोधात काही तरी भयंकर घडणार आहे, अशी भविष्यवाणी करीत ’न भुतो न भविष्यती’ आंदोलनाचा गर्भित इशारा काळा दिन आंदोलनातून सिडको आणि राज्य सरकारला देण्यात आला आणि तशी घोषणा लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांनी केली.  या वेळी रखरखत्या उन्हात सिडकोच्या नावाने शिमगा करण्यात आला तसेच येत्या काळात सिडको आणि राज्य सरकारच्या उरात धडकी भरवणारे निर्णय घेण्यात येतील असे या आंदोलनातून अधोरेखित करण्यात आले. लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार महेश बालदी, सरचिटणीस कॉम्रेड भूषण पाटील, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, अतुल पाटील, 27 गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, खजिनदार जे. डी. तांडेल, दशरथ भगत, राजेश गायकर, भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शाह, कामगार नेते सुरेश पाटील, अरुण जगे, महापालिका स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, नगरसेवक अभिमन्यू पाटील, अमर पाटील, प्रवीण पाटील, नगरसेविका हेमलता म्हात्रे, युवा नेते दशरथ म्हात्रे, न्हावा ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, कामगार नेते सुधीर घरत, सुनील घरत, यांच्यासह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जासई जन्मगावी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून 17 मार्च या सिडकोच्या वर्धापन दिनी पनवेल, उरण व बेलापूर पट्ट्यातील 95 गावांमधील सिडकोपीडित प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती व इतर प्रकल्प समित्यांच्या वतीने दास्तान फाटा येथे काळा दिन आणि रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी या क्रांतिभूमीतून ‘दिबां’च्या पुण्यतिथी दिनी म्हणजेच 24 जूनचा एल्गार जाहीर करतानाच आजपासून त्याची तयारी आणि नियोजन सुरू असल्याचे स्पष्ट झाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत 18 एप्रिल 2021 रोजी सिडको संचालक मंडळाने केलेला ठराव विखंडित करून लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा ठराव मंजूर करण्यात यावा, जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना विनविलंब 12.5% भूखंड वाटप करण्यात यावे, 25 फेब्रुवारी 2022 रोजी गरजेपोटी बांधकामांच्या बाबतीत प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयाबाबत प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन योग्य ते बदल करण्यात यावेत तसेच नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या सर्व प्रलंबित मागण्या बैठका घेऊन सोडविण्यात याव्यात या मागण्यांसाठी गुरुवारी जोरदार रास्ता रोको करण्यात आला. आंदोलन तीव्र होऊ नये यासाठी पोलिसांनी समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार महेश बालदी, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, कॉम्रेड भूषण पाटील, 27 गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, दशरथ भगत तसेच महिला आंदोलकांना ताब्यात घेतले व त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.  या वेळी सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील म्हणाले की, 24 जूनच्या आंदोलनात सर्व ताकदीनिशी तयारी करून उतरायचे आहे. पालघरमधील मंडळी 15 ते 20 हजार लोकांचा ताफा घेऊन गुजरात महामार्ग, भिवंडीवाले 20 हजार लोकं घेऊन नाशिक महामार्ग, ठाणे, कल्याण, डोंबिवलीवाले त्यांच्या भागातील रस्ते त्याचबरोबर रायगड, नवी मुंबईवाले पुणे तसेच गोवा महामार्ग बंद करण्याचा मानस करून आहेत. तशी चर्चा झाली आहे, पण अंतिम नियोजन येत्या कालावधीत होईल. केवळ आश्वासन नको, तर एक महिन्याच्या आत जेएनपीटी साडेबारा टक्के कार्यवाही सुरू झाली पाहिजे; अन्यथा या मागणीसाठी पुन्हा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत सर्व मागण्या प्रकल्पग्रस्तांच्या पदरात पडत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार आहे. 24 जूनला किमान 11 जिल्ह्यांत आंदोलन होईल आणि त्या तयारीला वेग येईल, असेही त्यांनी सांगितले. सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हटले की, सिडकोलाही आता समजतंय आपण यांना त्रास दिला तर ही लोकं आपल्याला इथे ठेवणार नाहीत आणि तशा दृष्टीने ते चर्चेला येतात. मागच्या आंदोलनामुळे एक एक यश प्रकल्पग्रस्तांच्या पदरात पडत आहे. दि. बा. पाटीलसाहेबांच्या नावाचा प्रस्ताव अद्याप मंजूर केला नसला तरी पूर्वीचा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा आग्रह न धरता तो दाबून ठेवला आहे. म्हणून 50 टक्के आपला विजय झाला आहे. विमानतळबाधित 27 गावांचे प्रश्न आहेत, उरण तालुक्यातील जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न सोडविण्याकरिता आपला आग्रह कायम राहिला आहे. प्रकल्पग्रस्तांची जिद्द मोठी आहे आणि या ठिकाणीच 16 जानेवारी 1984 रोजी ती दिसली. सर्व बाजूकडून पोलिसांची फौज चाल करीत आली आणि आम्ही मध्यभागी आम्ही होतो. मी स्वतः त्यामध्ये हजर होतो. पोलिसांनी गर्जना केली ’पळा जाता की नाही एक मिनिटात!’, आम्हीपण उत्तर दिले नाही आम्ही येथून हलणार नाही जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत. (पान 2 वर..) त्यानंतर पोलिसांकडून अश्रुधूर. मग गोळीबार झाला आणि या ठिकाणी दोन हुतात्मे झाले. हीच ती भूमी आहे. सिडकोने आपले हुतात्मे केले. आपल्या लोकांना देवाघरी पाठवले, त्यांच्या कुटुंबांची बिकट अवस्था झाली. 31 ते 32 जणांना गोळ्या लागल्या. शेकडो लोकांवर लाठीमार झाला. आमच्या हातात काहीच शस्त्र नव्हते. शेवटी ध्येय्याने जो वेडा होतो त्या वेळी तो कशाची तमा बाळगत नाही. तशा प्रकारे समित्या काम करीत आहेत. समितीत कोण येतोय, नाही येत याचा विचार आम्ही करीत नाही, पण ‘दिबां’च्या नावाला विरोध करू नका एवढेच आमचे त्यांना सांगणे आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत काही कमतरता असेल तर अवश्य सूचवा. आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. आपापसात भांडण करून चालणार नाही. काही लोकांना करायचे असेल तर त्याला इलाज नाही. 1984 सालापासून साडेबारा टक्के भूखंडचा विषय झाला आणि त्याच्या निविदाही प्रसिद्ध झाल्या. लोकनेते दि. बा. पाटीलसाहेबांच्या हस्ते नारळ वाढवून भूखंड विकसित करण्याच्या कामाला सुरुवात झाली, मात्र अजूनसुद्धा प्रकल्पग्रस्तांना भूखंड मिळत नसतील तर कसे होणार, असा सवाल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित केला. राज्य सरकार अडाणी आहे. शिकलेली लोकं असतील त्यामध्ये भरपूर, पण विचारांच्या बाबतीत अडाणी आहेत. उगाच आडी मारायची अशा प्रकारची कामे करतात. म्हणून आठ आठ महिने वर्कऑर्डर देत नव्हते. सिडको-सरकारशी बोला, जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंड प्रश्न मार्गी लावा, तरच हे 17 मार्चचे आंदोलन उग्र होणार नाही असे आमच्याशी चर्चा करायला आलेल्या पोलीस अधिकार्‍यांना आम्ही सांगितले आणि तसे त्यांनी सिडकोला-शासनाला कळविले असेल. त्यामुळे सिडकोने आता ऑर्डर दिली व हा प्रश्न मार्गस्थ लागला तो ‘दिबा’साहेबांच्या आशीर्वादामुळे आणि आंदोलनामुळेच हे शक्य झाले आहे. काल पी. पी. खारपाटील यांना वर्कऑर्डर घेण्यासाठी त्यांनी बोलावले. तीनचे साडेपाच वाजले मग त्यांनी सांगितले, नसेल द्यायची ऑर्डर तर सांगा आम्ही चाललो. त्या वेळी त्यांचा अभियंता मुंबईला होता. आता येतो, नंतर येतो चालले होते. त्या वेळी पुन्हा टोलवाटोलवी पाहता खारपाटील यांनी आम्ही चाललो. नसेल द्यायचे तर सांगा असा पुनरूच्चार केला. त्यांना माहिती होते आपण ऑर्डर नाही दिली, तर 17 मार्चचे आंदोलन उग्र होईल. हे लक्षात घेऊन त्या वेळी संबंधित दुसर्‍या अधिकार्‍याने वर्कऑर्डरवर सही केली. सिडकोला आपली नोंद घ्यावी लागत आहे हा आपल्या प्रकल्पग्रस्तांचा मोठा विजय आहे. यापुढील काळातही विजय परंपरा कायम ठेवायची आहे. लढाई जिंकूया, अशी सादही त्यांनी घातली. आमदार महेश बालदी म्हणाले की, राज्य सरकार संधीची वाट बघतेय, पण ती संधी आंदोलनाच्या रेट्यापुढे मिळालेली नाही हे या लढ्याचे यश आहे. सिडकोकडे प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सुटले पाहिजेत, न्याय मिळाला पाहिजे यासाठी सिडकोचा वर्धापन दिन काळा दिन पाळून आपण रास्ता रोको आंदोलन केले. सिडकोकडे जेएनपीटीच्या प्रलंबित साडेबारा टक्के भूखंडाचे टेंडर गेल्या 23 ऑगस्टला जाहीर केले होते. आठ महिने त्यांनी वर्कऑर्डर थांबवलेली. नाकर्त्या सरकारच्या नाकावर टिचून या आंदोलनाचा रेटा आणि धसका घेऊन सिडकोने ती वर्कऑर्डर ठेकेदाराला दिली. आम्हाला ठेकेदारांचे कौतुक नाही, पण साडेबारा टक्केच्या 50 वर्षांपासून प्रलंबित सिडकोचे नसलेले पण जेएनपीटीने देऊ केलेले साडेबारा टक्क्यांचे प्लॉट मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आणि त्याची डेव्हलपमेंट सुरू होईल तो आजच्या आंदोलनाच्या आनंदाचा भाग आहे. परवा झालेल्या सिडको एमडींसोबतच्या बैठकीत सर्व कमिटीकडे 27 गावचे प्रश्न, विमानतळबाधितांचे प्रश्न असतील मग त्यामध्ये सीसी, ओसीचा प्रश्न असेल, त्यानंतर 18 महिन्यानंतरच्या घरभाड्याचा प्रश्न, आर आर पॉकेटमध्ये राहिलेली डेव्हलपमेंट असेल या सर्व कामांची कमिटमेंट सिडको एमडींकडून समितीने घेतली हा आनंदाचा क्षण आहे की अशा आंदोलनापुढेच सिडको झुकली आणि त्यांनी आपल्या मागण्या मान्य केल्या. नंदराजजी काळजी करू नका. 18 महिन्यानंतरच्या देण्याचे भाडेही मिळवून घेऊ. विस्थापनानंतर एअरपोर्ट ऑथॉरिटीमुळे ओसी सीसी मिळण्यास उशीर होत असेल, तर त्याच्याकरिता उर्वरित महिन्यांचे भाडे सिडकोनेच द्यायला पाहिजे हासुद्धा आपल्या आंदोलनाचा भाग आहे. कालच लोकनेते गणेश नाईक यांनी 250 मिटरचा गावठाण विस्तार सरकारने केला तो कसा चूक आहे आणि त्याच्याकरिता काय काय बरोबर केले पाहिजे हे विस्तृतपणे विधानसभेत मांडले. त्याकरिता मी गणेश नाईक यांचे अभिनंदन करतो. अनेक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. एका बाजूला 250 मीटरची असेल, कुठल्या परिघामध्ये असेल, नाला असेल, नदी असेल, खाडी असेल, तर त्याची 250 मीटर उपयोगाची नाही. त्यामुळे दुसरीकडची 500 मीटरची करायला पाहिजे या सर्व गोष्टींची विस्तृत चर्चा समितीने परवा सिडको केलेली आहे. होळीचा सण असतानाही आजचा रास्ता रोको तळतळत्या उन्हात होत आहे. तुमचे आणि आमचे एकच धेय्य आहे ‘दिबा’साहेबांचे नाव विमानतळाला आणि प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न मार्गी लागलेच पाहिजेत. त्यासाठी प्रकल्पग्रस्त आणि लोकप्रतिनिधी आपण एक राहिलो, तर सिडकोच्या बापालाही सर्व कामे करायला भाग पाडू. ही एकजूट आपण कायम ठेवत यापुढेही जेव्हा जेव्हा आंदोलनाची हाक येईल तेव्हा तेव्हा प्रतिसाद द्याल, अशी अपेक्षाही आमदार महेश बालदी यांनी खात्रीने व्यक्त केली. आपला लढा चालू आहे. ज्या जमिनीवर विमानतळ उभे राहत आहे त्या विमानतळाला आमच्या बापाचे नाव म्हणजेच दि. बा. पाटीलसाहेबांचे नाव दिलेच पाहिजे. कितीही दिवस लढा चालू राहू दे. सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे आणि ती प्रतिज्ञा आपण सर्वांनी घेतली आहे, असे कॉ. भूषण पाटील यांनी म्हटले.

 

24 जूनला किमान 11 जिल्ह्यांत आंदोलन होईल -दशरथदादा पाटील

आंतराष्ट्रीय विमानतळ झाले पाहिजे याबद्दल दुमत नाही, पण त्या विमानतळाला ‘दिबां’चे नाव लागलेच पाहिजे हे अंतिम सत्य आहे. अन्यथा फार मोठी क्रांती घडेल आणि त्याशिवाय पर्याय राहणार नाही. या भागातील तसेच नवी मुंबईतील काही भागांतील प्रकल्पग्रस्तांना प्लॉट दिले गेले नाहीत. नगरविकास खात्याकडून काही प्लॉट विकले गेले आहे असे समजते आणि त्याचाही अभ्यास सुरू आहे. 40 वर्षे होऊन सिडको प्रश्न मार्गी लावत नाही. त्यामुळे सातत्याने आपल्याला आंदोलने करावी लागतात. दि. बा. पाटील आमच्या जीवनातील आदर्श आहेत. त्यांच्या आशीर्वादाने आंदोलनाची यशस्वी वाटचाल होत असून हा लढा सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत थांबणार नाही. येत्या 24 जूनला किमान एक लाख लोकांचा जनसमुदाय रस्त्यावर उतरणार असून त्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे, असे सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांनी सांगितले.

 

…तर सिडको समुद्रात बुडवायला लागेल लोकनेते रामशेठ ठाकूर

 

दि. बा. पाटीलसाहेबांचे नाव विमानतळाला मिळालेच पाहिजे हे आपले धेय्य ठरलेले आहे आणि सिडको ही प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत जो अन्याय करतेय तो दूर करण्यासाठी आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारलेला आहे. संघर्ष करून लोकांना त्रास देण्याचा आमचा धंदा नाही आणि ते काम आम्ही करणार नाही. फक्त प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत याच आमच्या रास्त अपेक्षा आहेत. सिडको जर चांगले नियोजन करीत असेल तर ठीक आहे, पण हे करताना स्थानिकांचा विचार करीत नसतील, तर सिडको काहीही उपयोगाची नाही. ती सिडको समुद्रात बुडवायला लागेल आणि एक दिवस तोही येईल, असा इशारा सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी दिला. या आंदोलनात महिला रणरागिणीसारख्या तळपळत्या उन्हात ठामपणे होत्या. त्यांचा आवाज बुलंद होता. त्यांचे कौतुक करू तेवढे कमी आहे, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी आवर्जून नमूद केले.

 

भूमिपुत्रांच्या गगनभेदी घोषणा

आंदोलनाला हिंसक वळण लागू नये यासाठी या वेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. तरीही भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांनी रखरखत्या उन्हात सिडकोच्या नावाने शिमगा केला. ‘अमर रहे अमर रहे, दिबा पाटीलसाहेब अमर रहे’, ‘विमानतळाला दिबासाहेबांचे नाव मिळालेच पाहिजे’, ‘सिडको हाय हाय’, ‘प्रकल्पग्रस्त एकजुटीचा विजय असो’, ‘ताई माई अक्का, एमडीला मारा धक्का’, ‘सिडको हटाव भूमिपुत्र बचाव’, ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा गगनभेदी घोषणा या वेळी देण्यात आल्या.

 

सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा कायम राहणार -आमदार प्रशांत ठाकूर

17 मार्च सिडकोचा स्थापना दिवस. सिडकोच्या दृष्टिकोनातून कदाचित तो अभिमानास्पद दिवस असेल, पण या दिवशी प्रकल्पग्रस्तांना संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय समितीने निर्णय घेतला की, लोकनेते दि. बा. पाटीलसाहेबांचे नाव विमानतळाला मिळाले पाहिजे आणि प्रकल्पग्रस्तांचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडविण्याच्या दृष्टिकोनातून क्रांतिभूमी दास्तान फाटा येथे रास्ता रोको करायचा. त्या अनुषंगाने आज आंदोलन पुकारले असून जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कितीही काळ लागो लढा यशस्वी होत नाही तोवर थांबायचे नाही, असा निर्धार सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी व्यक्त केला.

 

प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीचा विजय -आमदार महेश बालदी

आज होळी असतानाही मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त बंधू-भगिनी आंदोलनात सहभागी होऊन दि. बा. पाटीलसाहेबांचे नाव विमानतळाला देण्यासाठी आग्रही आहेत हे आपण दाखवून दिले. त्यासाठी मी प्रथम सर्वांचे आभार मानतो. गेल्या 10 जूनपासून आपण ‘दिबां’च्या नावाचा आग्रह धरत राज्य सरकारला आहे तेथे थोपवण्यात यश मिळविले आहे. 10 जूनला आपण मानवी साखळी आंदोलन केले, 24 जूनला सिडको भवनाला घेराव आंदोलन, 9 ऑगस्टला मशाल मोर्चा, 13 जानेवारीला निर्धार परिषद, तर 24 जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन केले. या सर्वांचा परिपाक असा झाला की, राज्य शासनाने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव सिडकोकडून करून घेतलेला तो कॅबिनेटमध्ये मंजूर केला नाही किंबहुना आणला नाही हे समिती व प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या आजपर्यंतच्या लढ्याचे फळ आहे, असे आमदार महेश बालदी यांनी म्हटले.

 

आज आपण या आंदोलनाची हाक दिली म्हणून परवा समितीबरोबर सिडको एमडींनी बैठक घेतली. त्यांनी विमानतळ नामकरणाचा प्रश्न राज्य सरकारच्या अखत्यारीतील आहे असे सांगितले. त्यामुळे आमचे महाराष्ट्र सरकारला आव्हान आहे की बर्‍या बोलाने लोकभावना लक्षात घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव विखंडित करावा आणि दि. बा. पाटीलसाहेबांच्या नावाचा ठराव सिडकोने करावा आणि त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू, कारण तो आमच्या अभिमानाचा आहे. भावी पिढीच्या भविष्यासाठी हा लढा आहेे. -कॉ. भूषण पाटील

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply