पनवेल : रामप्रहर वृत्त
जेएनपीटीच्या वतीने दास्तान फाटा येथे साकारल्या जात असलेल्या शिव-समर्थ स्मारकाचा भव्य उद्घाटन सोहळा रविवारी (दि. 17) सायंकाळी 5 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार संभाजीराजे भोसले, सचिनदादा धर्माधिकारी, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. जेएनपीटीने उरण तालुक्यातील जासई-दास्तान फाटा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीवर आधारित शिव-समर्थ स्मारक उभारण्याचे काम मागील वर्षापासून सुरू केले आहे. सुमारे 30 कोटी खर्चून 22 मीटर उंचीचे हे स्मारक जेएनपीटीच्या मालकीच्या पावणेदोन एकर जागेत उभारण्यात आले आहे. या स्मारकाच्या पुतळ्याचे काम थोर शिल्पकार दीपक थोपटे यांनी केले आहे. परिसरात आर्ट गॅलरी, शिवकालीन वस्तूंचे म्युझियम, मिनी अॅम्पी थिएटर, कॅफेटरिया, फाऊंटन गार्डन आदी सुविधाही उभारण्यात येत आहेत. या सोहळ्यास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिव-समर्थ स्मारक स्वागत समितीचे अध्यक्ष तथा जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, विश्वस्त दिनेश पाटील, रवी पाटील, प्रमोद जठार,
विवेक देशपांडे यांनी संयुक्तपणे केले आहे.