कर्जत ः बातमीदार
कर्जत तालुक्यातील उल्हास नदीच्या डोहात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे धुलिवंदनच्या उत्साहाला गालबोट लागले. कर्जत दहिवली भागात राहणारे काही तरुण शुक्रवारी (दि. 18) धुलिवंदन साजरा करून अंघोळ करण्यासाठी सांगावी-खांडपे येथील उल्हास नदीच्या डोहामध्ये दुपारी 1 वाजता गेले होते. त्या 10 जणांच्या ग्रुपमधील दोन तरुण करण धर्मसिंह आणि अक्षय विनोद डोडीया डोहात खोल पाण्यात बुडू लागले. हे दोघे बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांच्यासोबत असलेल्या अन्य तरुणांनी आरडाओरड सुरू केली. त्यानंतर स्थानिकांनी त्यातील करण धर्मसिंह यास बाहेर काढले आणि कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की तेथे पोहचल्या आणि त्यांनी खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या टीमला पाचारण केले. तहसीलदार विक्रम देशमुख यांनीही खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांना अपघातग्रस्तांच्या टीमला पाठवण्याची सूचना केल्यानंतर दुपारी 2.30 वाजता बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी टीम सांगवी येथे पोहचली. तेथे तीन तासांच्या शोधमोहिमेनंतर अक्षय विनोद डोडीया या 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.