सुधागड ः रामप्रहर वृत्त
पंजाबमधील लुधियाना येथील जीएसजी खालसा कॉलेज या ठिकाणी इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनने आयोजित केलेल्या वरिष्ठ गटातील राष्ट्रीय स्पर्धेत अनुज सरनाईकने नेत्रदीपक कामगिरी केली. अनुजने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना 85 ते 90 वजनी गटात पंजाब, राजस्थान, जम्मू काश्मीर (स्टेट पोलीस), कर्नाटक आणि अंतिम सामन्यात हरियाणाच्या खेळाडूला हरवून सुवर्णपदकावर नाव कोरले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत 32 राज्यांतील 750 खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले, डायरेक्टर जनरल मोहम्मद इक्बाल, जनरल सेक्रेटरी मुफ्ती हमिद यासिन, अॅलेक्स थॉमस, इरफान बुट्टो, टेक्निकल डायरेक्टर अब्दुल रझ्झाक, व्हाइस प्रेसिडेंट परविंदर वर्मा, जीएचजी खालसा कॉलेज गव्हर्निंग काऊन्सिल सेक्रेटरी डॉ. एस. एस. थिंद, प्रिन्सिपल डॉ. हरप्रीत सिंग, चंदिगढ पिंच्याक सिलॅट असोसिएशनचे सेक्रेटरी पार्थ भूषण लाल यांच्या हस्ते करण्यात आले. उपविजेत्या महाराष्ट्र संघाचे इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले, महाराष्ट्र अध्यक्ष सुरेंद्रप्रताप सिंग, सहखजिनदार मुकेश सोनवाणे यांनी अभिनंदन केले.