बैलगाडी शर्यती ही महाराष्ट्रातील परंपरा आहे. पंरतु या शर्यतींमध्ये होणारे अपघात, बैलांना होणारी मारहाण यामुळे बैलगाडी शर्यतींना बंदी घालण्यात आली होती. त्याविरोधत लोक न्यायालयात गेले. न्यायालयाने अटी आणि शर्तींवर बैलगाडी शर्यतींना परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यात बैलगाडी शर्यतींना पुन्हा सुरूवात झाली. रायगड जिल्ह्यातदेखील मोठ्या प्रमाणावर बैलगाडी शर्यती होऊ लागल्या आहेत. मात्र या शर्यतींचे आयोजन करताना आयोजक न्यायालयाने घातलेल्या अटींचे पालन करताना नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील मुरुड, अलिबाग आणि कर्जत येथील बैलगाडी शर्यतींमध्ये आपघात झाले. त्यात तीन जण गंभीर जखमी झाले. दोघांचा मृत्यू झाला. या तीन अपघातांमुळे अनधिकृतपणे आयोजीत केल्या जाणार्या बैलगाडी स्पर्धांमधील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या आपघातांना जबाबदार कोण? बैलगाडी स्पर्धांच्या आयोजनावर असलेली बंदी न्यायालयाने उठवली आहे. मात्र ही बंदी उठवतांना काही अटी आणि शर्ती न्यायालयाने घालून दिल्या आहेत. स्पर्धेच्या आयोजनासाठी जिल्हाधिकार्यांची रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र जिल्ह्यात ठिकठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या परवानगी विनाच या स्पर्धांचे आयोजन होत आहे. त्यात आपघात होत आहेत. अनेक किरकोळ अपघात होतच असतात. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. काही दिवसांपूर्वी मुरूड तालुक्यातील नांदगाव समुद्र किनार्यावर बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात एक बैलगाडी थेट प्रेक्षकांत घुसली. त्यात दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघाताची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारीत झाली. यानंतर स्पर्धेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कर्जत तालुक्यातील उक्रूळ येथे धुलीवंदनाचे औचित्य साधून बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी घेण्यात आली नव्हती. अनधिकृतपणे आयोजित केलेल्या या स्पर्धेदरम्यान एक बैलगाडी प्रेक्षकात घुसली. यात दौलत बाजीराव देशमुख हे जखमी झाले. डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अलिबाग तालुक्यातील समुद्र किनार्यावर अशाच एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अलिबाग तालुका पंचायत समिती सदस्य उमेश वर्तक गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मुबईत उपचार सुरू होते. परंतु त्यांचा मुत्यू झाला. या तीन अपघातांमुळे अनधिकृतपणे आयोजीत केल्या जाणार्या बैलगाडी स्पर्धांमधील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वास्तविक बैलगाडी स्पर्धा आयोजन करण्यासाठी संबंधीत जिल्हाधिकार्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नाही. परवानरगी न घेताच स्पर्धेचे आयोेजन केले जाते. बरं, ही स्पर्धा लपूनछपून होत नाही, उघडपणे होते. परंतु अनधिकृतपणे आयोजित केल्या जाणार्या या स्पर्धांकडे प्रशासनाची डोळोझाक होत आहे. परवानगी न घेता अनधिकृत बैलगाडी स्पर्धांचे आयोजन करणार्या आयोजकांवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे आयोजक निर्ढावले आहेत. स्पर्धेचे आयोजन केले तरी कारवाई होत नाही, असा गैरसमज झाल्यामुळे अनधिकृत बैलगाडी शर्यतींचे आयोजन केले जाते. वास्तविक परवानगी न घेता बैलगाडी शर्यतींचे आयोजन करणार्या आयोजकांवर कारवाई करायला हवी. परंतु ती करायची कुणी? कारवाई करून आपण कशाला वाईटपणा घ्यावा, असा विचार केला जात असल्यामुळेे कोण कारवाई करत नाही. प्रशासन आणि पोलीस याकडे दुर्लक्ष करतात. या स्पर्धांची माहिती पोलीस आणि प्रशासनाला मिळत असतेच. गावतील ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल यांना या स्पर्धांची माहिती असते. ते आपल्या वरिष्ठांना कळवण्याचे धाडस करत नाहीत. मागील दोन महिन्यात रायगड जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीत झालेल्या तीन अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आतातरी प्रशासनाचे आणि पोलिसांचे डोळे उघडले पाहिजे. अजून किती बळींची वाट पाहाणार? आता प्रशासनाने कडक धोरण अवलंबले पाहिजे. अनधिकृतपणे बैलगाडी स्पर्धांचे आयोजन करणार्यांवर पोलीस आणि महसुल प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई केली पाहिजे. अनधिकृत स्पर्धांचे आयोजन केले जात असेल तर आयोजकांवर ठोस कारवाई व्हायला हवी. केवळ स्पर्धेत सहभागी झालेल्यांचेच अपघात होतात, असे नाही तर गाड्या प्रेक्षकांमध्ये घुसूनदेखील अपघात होतात. त्यामुळे प्रेक्षकांच्या सुरक्षेची काळजी आयोजकांनी घ्यायाल हवी. बैलगाडी स्पर्धेत जखमी झालेल्यांची जबाबदारी आयोजक घेत नाहीत. स्पर्धेदरम्यान जखमी होणार्या व्यक्तींची जबाबदारी आयोजकांवर टाकायला हवी. बैलगाडी शर्यत आयोजन करण्याची परवानगी घेण्यासाठी आयोजकांनी स्पर्धेचा विमा काढणे अनिवार्य करायाला हवे. त्यामुळे दुर्दैवाने एखादा अपघात झाला तर जखमींना उपचारासाठी मदत होऊ शकेल. न्यायालयाने घालून दिलेल्या शर्तींचे पालन केले जातेय की, नाही हे पाहण्याची जबाबदरी जिल्हा प्रशासनाची आहे. ती त्यांनी पार पाडायला हवी. अपघात झाल्यानंतर गुन्हे दाखल करण्यापेक्षा स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच करावाई केली पाहिजे.
-प्रकाश सोनवडेकर