Breaking News

अनधिकृतपणे पार्क केले जाणारे गॅस सिलिंडरचे ट्रक हटविण्याची मागणी

कळंबोली : प्रतिनिधी – रहिवासी क्षेत्रात अनधिकृतरीत्या पार्क करण्यात येणार्‍या गॅस सिलिंडरचे ट्रक हटविण्यासंदर्भात भाजप नगरसेविका नेत्रा पाटील यांनी मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी खारघरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच खारघरच्या वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणीवजा तक्रार केली आहे.

नगरसेविका पाटील यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे पनवेल महानगरपालिकेच्या खारघर प्रभाग क्र. 4 सेक्टर 19 येथील रहिवाशांनी केलेल्या तक्रारीनुसार भारत गॅस एजन्सीचे गॅस सिलिंडरने भरलेले ट्रक हे प्लॉट नं. 55, तुलसी विहार सोसायटीजवळ पार्क केलेले असतात. नागरी वस्तीमध्ये भरलेल्या गॅस सिलिंडरच्या गाड्या (ट्रक) दिवसरात्र उभ्या केलेल्या असतात. विशेष म्हणजे त्याच ठिकाणी ट्रकमधून छोट्या टेम्पोत भरलेल्या गॅस सिलिंडरची चढ-उतरदेखील केली जाते.

ही एजन्सीही ज्वालाग्रही वस्तूच्या साठवण व वितरण नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे आजूबाजूच्या सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ते आपला जीव धोक्यात घालून राहत आहेत. रहिवाशांनी वेळोवेळी सदर गॅस एजन्सीच्या व्यवस्थापनालादेखील याबाबतची कल्पना दिली आहे. तरीदेखील ते गॅसने भरलेले सिलिंडरचे ट्रक त्याच ठिकाणी पार्क करतात. त्यामुळे भविष्यात येथे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात. ही जागा काही ट्रक अथवा अवजड वाहन पार्किंगसाठी नाही. अशा अनधिकृत पार्किंगमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या ठिकाणी त्वरित कार्यवाही करावी, असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply