Breaking News

पांढर्या कांद्याने शेतकर्यांच्या डोळ्यांत पाणी

 उत्पादन घटले; अवघे 50 टक्के पीक बाजारात

अलिबाग : रामप्रहर वृत्त

गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील प्रसिद्ध पांढर्‍या कांद्याला मोठा फटका बसला आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारात पाठविण्यास सुरुवात झाली असली तरी उत्पन्नात घट झाल्याने केवळ 50 टक्के पांढरा कांदा बाजारात दाखल झाला. दोन महिन्यांत 35 टन कांदा बाजारात दाखल होणे अपेक्षित होते. परंतु, अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. आतापर्यंत 18 टन कांदा बाजारात पाठविण्यात आला. या कांद्याला डोंबिवली, वाशी, पुणे, मालाड, बीड येथून प्रचंड मागणी आहे.

अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळे, तळवली, वाडगाव आदी गावांसह रोहा व माणगाव तालुक्यात पांढर्‍या कांद्याची लागवड केली जाते. या कांद्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत असून कांदा उत्पादक शेतकर्‍यांना यातून सुमारे 30 लाखांची उलाढाल होते. 300 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात कांद्याची लागवड केली जाते.

अवकाळी पावसामुळे यंदा लागवड एक महिना पुढे गेली. डिसेंबरमध्ये बाजारात येणारे हे पीक जानेवारीत बाजारात जाण्यास तयार झाले. स्थानिक बाजारांसह रायगड व अन्य जिल्ह्यांतील बाजारात पांढर्‍या कांद्याला प्रचंड मागणी वाढली आहे.

दोन महिन्यांत आतापर्यंत 35 टनाऐवजी केवळ 18 टन कांद्याचा पुरवठा करण्यात आला आहे. तो वाशीसह अन्य बाजारात दाखल करण्यात आला आहे. मुंबईसह पुणे, डोंबिवली, बीड येथून कांद्याला प्रचंड मागणी आली आहे, परंतु त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.

केवळ आठ दिवस पुरेल, इतकाच कांदा उपलब्ध असल्याची माहिती कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडून देण्यात आली.

तब्बल 50 रुपयांनी महागला

अवकाळी पाऊस, बदलत्या वातावरणामुळे पांढर्‍या कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. यंदा केवळ 50 टक्केच कांद्याचे उत्पादन झाले. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेने प्रतिकिलोला हा कांदा 20 ते 40 रुपयांनी महाग झाला आहे. लहान आकाराच्या 10 किलो कांद्यासाठी 600 रुपये तर मोठ्या आकाराच्या कांद्यासाठी 800 रुपये द्यावे लागत आहेत. गेल्या वर्षी हाच कांदा 400 ते 500 रुपयांना मिळत होता.

अलिबागच्या पांढर्‍या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळणार असल्याने शेतकर्‍यांनी पांढरा कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली, परंतु अवकाळी पावसाने शेतकर्‍यांची फार मोठी निराशा केली.

-सतीश म्हात्रे, कांदा उत्पादक शेतकरी

पांढर्‍या कांद्याला जीआय संस्था प्रमाणपत्र मिळाल्यावर शेतकर्‍यांची नोंदणी होणार आहे. दुसर्‍या जिल्ह्यातील कांदा अलिबागच्या नावाने विकल्यास ते कारवाईस पात्र ठरणार आहेत.

-दत्तात्रेय काळभोर, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply