खोपोली : प्रतिनिधी
आपले गाव आपला परिसर स्वच्छ हवा तसेच रोगराईपासून दूर राहावे असा संदेश देत नगरपालिका हद्दीतील चिंचवली शेकीन या गावातील नवतरूण सेवा फाउंडेशन मंडळाच्या 20 कार्यकर्त्यांनी स्वच्छता अभियान राबविली.
शहर गाव स्वच्छ ठेवणे ही नगरपालिकेचीच जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाचे स्वच्छता राखण्याचे कर्तव्य आहे. यासाठी रविवार सुट्टीचा दिवस पाहून गावातील सर्व तरुण शाळेजवळ एकत्र आले. हातात झाडू, घमेले घेऊन गावातील सर्व रस्ते, गल्ली स्वच्छ करून तो कचरा एकत्रित कचरापेटीत जमा केला.
प्रत्येक रविवारी आम्ही स्वच्छता अभियान राबविणार आहोत. पुढच्या वेळी परिसरातील वस्ती, शाळा क्रमांक 9 पटांगण, सरस्वती नगर, गणेश नगर, व इतर भागात स्वच्छता मोहीम राबविणार असल्याचे कार्यकर्त्यांनी या वेळी सांगितले.
यामुळे सर्व तरुणांचे परिसरातून कौतुक होत आहे. या अभियानात माजी उपनगराध्यक्ष रमेश जाधव यांनी स्वच्छता अभियानास मार्गदर्शन केले.