Breaking News

चक्क शौचालयात धुतल्या जाताहेत शिवभोजन केंद्रातील जेवणाच्या थाळ्या

यवतमाळ : प्रतिनिधी
शिवभोजन केंद्रासंदर्भात एक धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यात समोर आला आहे. महागाव येथील शिवभोजन केंद्रावरील थाळ्या चक्क शौचालयात धुतल्या जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या किळसवाण्या प्रकारामुळे संताप व्यक्त होत असून कमी किमतीत भोजन देण्यात येणार्‍या शिवभोजन योजनेच्या दर्जासंदर्भात शंका उपस्थित होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये यवतमाळ जिल्ह्यामधील महागाव येथील एका शिवभोजन थाळी केंद्रावरील अस्वच्छता आणि व्यवस्थापनामधील त्रुटी स्पष्टपणे समोर आल्या आहेत. महागाव तालुक्यामधील त्रिमुर्ती महिला बचत गटाच्या माध्यमातून नवीन बस स्टॅण्डसमोर चालविण्यात येणार्‍या शिवभोजन थाळी केंद्रावरील भांडी शौचालयात धुतली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या केंद्रात ग्राहकांना जी थाळी दिली जाते ती जेवण झाल्यानंतर शौचालयातील पाण्याने धुतली जात असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे हे शिवभोजन थाळी केंद्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलेचे असल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकारे गलिच्छ जागेवर भांडी धुवून त्याच थाळीत पुन्हा भोजन देत असल्याने एक प्रकारे गरिबांची थट्टाच उडवली जात आहे. आता या शिवभोजन थाळी केंद्र चालकांवर काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply