जलशक्ती अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार
पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर
पनवेल महापालिका क्षेत्रात केंद्रीय जलशक्ती अभियानांतर्गत जलसंवर्धनाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपर्क साधून या कामांचा आढावा घेतला.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या नॅशनल वॉटर मिशनमार्फत देशासह राज्यात 29 मार्च ते 30 सप्टेंबर या कालावधीत जलशक्ती अभियान ‘कॅच द रेन’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ मंगळवारी (दि. 29) देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाला. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य सचिवांनी जिल्हा प्रशासनातील अधिकार्यांशी संवाद साधत अभियानाबाबत आढावा घेतला.
या अभियानांतर्गत महापौर डॉ. कविता चौतमोल व आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका क्षेत्रातील विहिरींचा गाळ काढणे, विहिरी स्वच्छ करणे, आवश्यक ठिकाणी बोअरवेल काढणे, जुन्या बोअरवेल पुनर्जीवित करणे, शासकीय-निमशासकीय इमारतींमध्ये रेन हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे तसेच खाजगी विकसकांना नव्याने बांधणार्या गृहनिर्माण संस्थांमध्ये रेन हार्वेस्टिंग करणे बंधनकारक असणार आहे. जलसंवर्धनाबाबत जलशपथ घेण्याचे आवाहन या अभियानांतर्गत करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून पावसाळापूर्व व पावसाळ्यानंतरचे पाणी साठविण्यासाठी
पालिका क्षेत्रात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार आहेत.