Breaking News

सीकेटी कॉलेजमध्ये सीकेटीएन्स फिल्म सोसायटीची स्थापना

पनवेल ः रामप्रहर वृत्त

विद्यार्थ्यांमध्ये चित्रपट निर्मिती विषयी तसेच चित्रपटाबद्दल अभ्यासक वृत्ती वाढविण्याच्या हेतूने रविवारी (दि. 27) जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) येथे सांस्कृतिक विभाग, इंग्रजी विभाग आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सीकेटीएन्स फिल्म सोसायटीची स्थापना करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रभात चित्रमंडळाचे सचिव डॉ. संतोष पाठारे यांनी उपस्थिती लावली. या वेळी ‘मयत’ ही फिल्म देखील विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. सोबतच डॉ. संतोष पठारे यांनीविद्यार्थ्यां सोबत संवाद साधला. या वेळी कॉलेजचा माजी विद्यार्थी, अभिनेता अजिंक्य ननावरे यांची विशेष उपस्थिती लाभली. जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी मिमिक्री आणि स्किट सादर केली. याप्रसंगी कलादर्पण सांस्कृतिक स्पर्धेअंतर्गत 18 स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या सर्व स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळाही या वेळी पार पडला.

सीकेटीएन्स फिल्म सोसायटीच्या स्थापनेसाठी फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाचे माजी खजिनदार सुधीर जोगळेकर आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील आयक्यूएसी समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, कला शाखा प्रमुख डॉ. बी. एस. पाटील, इंग्लिश विभाग प्रमुख आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आर. व्ही. येवले, सांस्कृतिक समन्वयक गणेश जगताप, एनएसएस प्रोग्राम ऑफिसर प्रा. एस. एन. परकाळे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

या नावीन्यपूर्ण फिल्म सोसायटीच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply