Tuesday , March 28 2023
Breaking News

मुंबईच्या छपाई व्यवसायातील उद्योजक रघुनाथ सखाराम महाडिक

महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते व मुंबईच्या छपाई व्यवसायातील एक यशस्वी उद्योजक रघुनाथ सखाराम महाडिक यांचे दि. 21 मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत महाडिक यांनी या छपाई व्यवसायात विलक्षण प्रगती करून नावलौकीक मिळवला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र मुद्रण परिषदेची फार मोठी हानी झाली आहे. त्यांच्या यशस्वी वाटचालीचा हा परिचय.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत, अतिशय परिश्रम करून, जे लोक एखादा व्यवसाय उभारतात आणि आपल्या कार्य कर्तृत्वाने तो नावारूपाला आणतात, त्यांना आपण ‘प्रतिथयश उद्योजक’ म्हणतो. समाजात असे अनेक उद्योजक आहेत की त्यांची यशोगाथा इतरांना मार्गदर्शक ठरणारी असते. मुंबईच्या वडाळा विभागात असलेल्या सुनील बायडिंग अ‍ॅण्ड प्रिंटिंग वर्क्स या छापखान्याचे मालक रघुनाथ सखाराम महाडिक हे अशाच प्रतिथयश उद्योजकांपैकी एक! त्यांची यशोगाथाही इतरांना मार्गदर्शक ठरणारी!

खेड तालुक्यातल्या (जि. रत्नागिरी) पोयनार या गरीब शेतकर्‍यांच्या अविकसित गावात 16 मे 1948 साली जन्मलेल्या रघुनाथ महाडिक यांचे प्राथमिक शिक्षण गावातील एका शाळेत झाले. वडील सखाराम बाबाजी महाडिक हे शेतकरी. दिवसरात्र शेतात राबत, पण दोन वेळचे पोटभर अन्नही त्यांना मिळत नसे. त्यामुळे या महाडिक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. रघुनाथ महाडिक यांना शिक्षणाची खूप आवड, पण परिस्थितीमुळे नाईलाजास्तव त्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले. गावात कामधंदा करून पोट भरण्याची सोय नव्हती. शिवाय त्याकाळी खेडेगावातल्या माणसांना मुंबईबद्दल एक वेगळं आकर्षण होतं. या महाकाय श्रीमंत मुंबईत एखादा कामधंदा करून आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करता येईल, असा विश्वास त्यांना होता, म्हणून त्यांनी वयाच्या 10व्या वर्षी मुंबईची वाट धरली. ते साल होतं 1958. मुंबईत आल्यावर त्या लहान वयातही त्यांनी कामधंदा शोधायला सुरुवात केली, परंतु शिक्षण नाही आणि वयही कोवळे. त्यामुळे त्यांना एखाद्या मोठ्या कंपनीत किंवा जड काम करण्याची संधी मिळणं मुश्कीलच! शेवटी त्यांनी काही काळ हॉटेलमध्ये काम केलं, तर काही वेळ मुलं सांभाळण्याचं काम स्वीकारलं, पण पोटाची खळगी भरण्यासाठी कोणापुढे हात पसरला नाही.

 1962 साली त्यांना कमर्शियल बुक बायडिंग वर्क्स या कंपनीत नोकरी मिळाली. पगार होता रोज 2 रुपये 50 पैसे. या प्रेसमध्ये तळमजल्यावरून तिसर्‍या मजल्यावर लिफ्टविना पुस्तकांच्या बंडलाची त्यांना ने-आण करावी लागे, पण महाडिकांनी तेही काम आनंदाने केलं. कारण या नोकरीमध्येही त्यांना खूप काही शिकता आलं. पुस्तक बांधणीचे चांगले तंत्र त्यांना अवगत झाले.

  पण त्यांचे मन नोकरीत कधीच रमले नाही. त्यामुळे त्यांनी काही काळ ठाण्याला एका गारमेंट कंपनीत नोकरी पत्करली. तेव्हा त्यांना रु. 3.30 पैसे रोजगार मिळत असे. 1964 ते 1968पर्यंत त्यांनी या गारमेंट कंपनीत नोकरी केली, पण त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी ते त्यांना स्फूर्ती देत होते. त्यामुळे ते पुन्हा प्रेस लाइनमध्ये आले, ते एका जिद्दीने आणि मनाशी काही निश्चय करून.

त्याकाळी  निर्णय सागर  प्रेसमध्ये  बालभारतीच्या पुस्तकांची छपाई होत असे. या पुस्तकांचे बायडिंग करण्याचे काम रघुनाथ महाडिक व त्यांच्या इतर तिघा मित्रांनी पार्टनरशिपमध्ये घेतले आणि तेथूनच त्यांच्या आयुष्याला नवे वळण लागले. कॉन्ट्रॅक्टमुळे पगारापेक्षा जास्त रक्कम आपल्याला मिळते हे त्यांनी जाणले आणि व्यवसायाबद्दलचा आत्मविश्वास वाढला, पण काही दिवसांनी  निर्णय सागरचे हे कॉन्ट्रॅक्ट संपले आणि पुन्हा महाडिकांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली.   अशा कठीण परिस्थितीत विचार करता करता एके दिवशी परळच्या केईएम हॉस्पिटलजवळून जात असता त्यांना निर्णय सागर प्रेसचे मॅनेजर  प्रभाकर मोरे यांनी पाहिले व त्यांनी आपली गाडी थांबवून त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांना कळले की महाडिक सध्या बेकार असून कामाच्या शोधात आहेत. त्यांनी त्यांना लोअर परळच्या एका प्रेसचा पत्ता दिला व दुसर्‍या दिवशी तेथे येण्यास सांगितले. महाडिक ठरल्या वेळेप्रमाणे दुसर्‍या दिवशी त्या प्रेसवर गेले. तो प्रेस सर्वस्वी प्रभाकर मोरे, एस. एल. कुलकर्णी व स. का. पाटील यांचे एक चिरंजीव अशा तिघांनी भागिदारीत सुरू केला होता. बर्‍याच

चर्चेनंतर महाडिकांच्या कामाची त्यांना खात्री पटली आणि महाडिकांना तेथे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर बायडिंगचे काम मिळाले. 1969 ते 74 अशी सहा वर्षे त्यांनी हे काम स्वत:च्या हिमतीवर केले. या कालावधीत त्यांच्या अनेक मोठ्या लोकांशी व काही प्रकाशकांशी ओळखी झाल्या.

या प्रेसमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर बायडिंगची कामे करीत असताना महाडिकांनी लोअर परळ, वरळी, प्रभादेवी या भागातील प्रेसमधील बायडिंगची कामे घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्याकडील बायडिंगची कामे वाढू लागली, पण घेतलेली कामे इमाने-इतबारे अहोरात्र कष्ट करून ते पुरी करीत असत. त्यामुळे रघुनाथ महाडिकांबद्दल या प्रेस व्यवसायात दृढविश्वासाची व आपुलकीची भावना निर्माण झाली. याच काळात अक्षर प्रतिरूप मुद्रणालयाचे मालक व प्रिंटिंग व्यवसायातील एक नामांकित उद्योजक अरुण नाईक यांची त्यांच्याशी ओळख झाली. अरुण नाईक यांचा वडाळा येथे  इंडिया प्रिंटिंग हाऊसमध्ये मोठा प्रेस होता. त्यांचे वडील बापूराव नाईक हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळावर बरीच वर्षे कार्यरत होते. त्यामुळे बालभारती या संस्थेची शालेय पाठ्यपुस्तके छपाईची कामे त्यांना मिळत, पण या पुस्तकांची बांधणी करण्याच्या कामाला त्यांना एक स्वतंत्र माणूस हवा होता. जेणेकरून तो ही सर्व कामे माणसं आणून वेळेवर करून देईल. अरुण नाईक यांनी या कामासाठी रघुनाथ महाडिक यांची निवड केली व त्यांनी महाडिक यांना आपल्या प्रेसमध्ये सर्व पुस्तकांच्या बांधणीचे काम दिले.

महाडिक ही कामे नाईक यांच्या वडाळा येथील प्रेसमध्ये बाहेरील माणसे आणून त्यांना रोजगार देऊन स्वतंत्ररित्या करीत असत. अरुण नाईक यांचा इंडिया प्रिंटिंग हाऊसमध्ये दुसर्‍या माळ्यावर प्रेस होता. त्यांची पहिल्या माळ्यावर असणारी जागा त्यांनी एकाला भाड्याने दिली होती. ती परत मिळवण्यासाठी कोर्ट-कचेर्‍या सुरू होत्या. शेवटी त्यातील अर्धी जागा 1976 साली कोर्टाच्या निर्णयामुळे त्यांना परत मिळाली. दरम्यानच्या काळात महाडिक हे नाईक यांची कामे दिवसरात्र जागून पूर्ण करीत असत. जबाबदारी टाकल्यावर दिवसाचे 14 ते 18 तास ते कामे करीत. त्यामुळे अरुण नाईक यांचा महाडिकांनी विश्वास संपादन केला होता.

दिवसेंदिवस अरुण नाईक यांच्या प्रेसमधील कामे वाढत होती आणि ती पूर्ण करण्यासाठी महाडिकांना जागा अपुरी पडत होती. एके दिवशी महाडिकांनी भीत भीतच अरुण नाईक यांच्याकडे पहिल्या मजल्यावरील जागेसाठी शब्द टाकला आणि काय आश्चर्य, नाईक यांनी महाडिकांचा शब्द खरा करून दाखविला. महाडिकांना पहिल्या मजल्यावरील जागा भाड्याने मिळाली. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढला. कामाला अधिक गती आली. बायडिंगच्या वाढत्या कामामुळे महाडिकांना आता फोल्डिंग मशीनची आवश्यकता भासू लागली, पण ही मशीन घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. एके दिवशी अरुण नाईक यांनी त्यांना दादरच्या जनता सह. बँकेत नेले व तेथील मॅनेजरला भेटून महाडिक यांना या फोल्डिंग मशिनसाठी लोन देण्याची विनंती केली, पण मॅनेजरने महाडिकांना लोन देण्याचे नाकारले. महाडिकांप्रमाणे नाईकांनाही त्यावेळी वाईट वाटले, पण नाईकांनी धीर सोडला नाही.

 व्यवसाय वाढवण्याच्या या सार्‍या व्यापात महाडिकांचे कुटुंबाकडे थोडे दुर्लक्षच झाले, पण त्यांच्या पत्नी वनिता महाडिक यांनी परिस्थिती समजून घेऊन मोठ्या हिमतीने घर सांभाळले. मुलांना मोठे केले.  पुढे 1987 साली परिस्थिती थोडी सुधाल्यावर वडाळ्याच्या सहकारनगर येथे त्यांनी एक जागा घेतली. स्वत:च्या जागेमुळे महाडिकांचे कुटुंब मुंबईत चांगलेच स्थिरावले आणि नव्या जोमाने त्यांनी व्यवसायात भरारी घेतली. बायडिंगचा स्वत:चा व्यवसाय करता करता त्यांना प्रिंटिंगचेही वेध लागले. आपणही एखादी प्रिंटिंग मशीन घेऊन या व्यवसायात नाव कमवावे, असा ध्यास त्यांनी घेतला आणि याच ध्यासातून त्यांनी 1989 साली सिंगल कलर मशीन घेतली. प्रिंटिंग मशीन घेतली, पण प्रिंटिंगची कामे कशी मिळवायची, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्याकाळी प्रिंटिंग व्यवसायात फार मोठी चढाओढ, स्पर्धा होती.

  या धंद्यात स्पर्धा तर होतीच, पण या स्पर्धेत महाडिक आपल्या प्रेमळ व आस्थेवाईक स्वभावाने टिकून राहिले. हळूहळू या प्रिंटिंग व्यवसायाचे गणित त्यांना चांगलेच जमले. कामे वाढली. दरम्यान, ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईटचा जमाना मागे पडू लागला आणि रंगीत व बहुरंगीत जमान्याचे आकर्षण वाढू लागले. प्रिंटिंग व्यवसायाचे स्वरूपही बदलले. नव्या तंत्रज्ञानाने झटपट व सुबक प्रिंटिंगला महत्त्व प्राप्त झाले. काळाची पावले ओळखून हे नवं तंत्रज्ञान आपणही आत्मसात करायला हवं. नाहीतर आपण मागे राहू! नव्हे एक दिवस हा व्यवसायच आपल्याला बंद करावा लागेल, ही जाणीव महाडिकांना झाली. त्यांनी 1999 साली आपल्या प्रेसमध्ये डबल कलरची मशीन आणली. त्यासाठी त्यांना बरीचशी ओढाताण करून आर्थिक जमवाजमव करावी लागली, पण त्यांनी ती मोठ्या हिमतीने केली. 2011 साली चार रंगी (फोर कलर) छपाईचं मशीन त्यांनी आणलं. या मशिनरी खरेदी करण्यासाठी ते स्वत: व त्यांचे ज्येष्ठ पुत्र सुनील हे अहमदाबाद येथे गेले होते व त्यांनी या सार्‍या मशिनरीची इत्थंभूत माहिती घेऊन त्या खरेदी केल्या. बँकेचे कर्ज काढले.

मशिनरी आल्या. त्या चालविण्यासाठी नव्या जाणकार व अनुभवी कामगारांची त्यांना प्रेसमध्ये भरती करावी लागली. एकीकडे बँकेचे कर्ज तर दुसरीकडे नव्या कामगारांचा वाढता पगार आणि इतर खर्च हा सारा आर्थिक डोलारा सांभाळताना महाडिकांना फार कसरत करावी लागली. कारण त्यांच्या प्रामाणिक स्वभावाचा त्याकाळी अनेक जण गैरफायदा घेत असत. काम करून झाल्यावर पैसे देण्यासाठी बर्‍याच जणांकडून टाळाटाळ होत असे, पण महाडिकांनी हे पैसे वसूल करण्यासाठी कधी कोणाला दुखावलं नाही वा अपशब्दाने माणुसकीही सोडली नाही.

 जे माझ्या नशिबात नाही, त्यासाठी मी कधीच धावणार नाही. देवावर आणि श्रमावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे माझ्या श्रमाचा मोबदला मला निश्चितपणे मिळेल, असे ते नेहमी म्हणत. आयुष्यात आपण जे काही कमावतो ते बुद्धीने व कष्टाने हे लक्षात ठेवलं की आपल्या मूर्खपणाने अथवा दुसर्‍याच्या शहाणपणाने काही गमावण्याची आपल्यावर वेळ येत नाही, हा एका विचारवंताचा विचार त्यांच्या मनात पक्का रुजला होता.

मुंबईत गिरणी कामगारांच्या संपानंतर कामगारांची आर्थिक परिस्थिती बिघडली. अनेक जण कर्जबाजारी झाले, तर कित्येकांनी मुंबईतल्या महागाईला कंटाळून गावचा रस्ता धरला, पण ज्यांना आपले गावच नव्हते, ते कामगार मात्र मुंबई शहरात हलाखीची परिस्थिती जगत होते. नायगाव-वडाळा या विभागात गिरणी कामगारांची संख्या बरीच मोठी होती. त्या कामगारांना काही आर्थिक मदत व्हावी व त्यांच्या कुटुंबाला थोडासा आधार द्यावा या विचारातून रघुनाथ महाडिक यांनी 2004 साली काही मित्रांच्या सहकार्याने वडाळा येथे साई-सिद्धी नागरी सहकारी पतपेढीची स्थापना केली. या पतपेढीमार्फत आजवर त्यांनी अनेक दुर्बल घटकांना आर्थिक मदत करून त्यांचे संसार उभे केले.

ज्या खेडेगावात महाडिकांचा जन्म झाला, त्या पोयनार गावची परिस्थिती खूपच नाजूक होती. साधारण 300-350 उंबरठ्याचे हे अविकसित गाव अगदी रानावनात व डोंगराळ भागात वसलं होतं. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने ते दुर्लक्षितच होते, पण या गावातल्या प्रत्येक उंबरठ्यात असणारा जिव्हाळा गावकर्‍यांना एकीच्या बंधनात गुंफून ठेवत होता.

-दीपक रा. म्हात्रे (ज्येष्ठ पत्रकार)

Check Also

फिरूनि नवी जन्मेन मी…

सालाबादप्रमाणे यंदाही देशभरात ‘जागतिक महिला दिन’ साजरा होईल. शहरी भागांतील कार्यालयांमध्ये महिला शक्तीचे गुणगान गाणारे …

Leave a Reply