दुरूस्तीकडे सिडकोचे दुर्लक्ष; प्रवाशांमध्ये नाराजी
उरण : प्रतिनिधी
उरण चारफाटा सर्कल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवाशांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याच्या डागडुजीकडे सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे. सिडकोने या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी हाती न घेतल्यास अपघात होण्याचा संभव आहे.
सिडकोने उरण शहराच्या प्रवेशद्वाराजवळील परिसराचा कायापालट करण्यासाठी 2019-20मध्ये ठेकेदारांच्या माध्यमातून पुढाकार घेतला, परंतु परिसरातील रस्त्याची कामे ही आजतागायत रेंगाळल्याने त्याचा त्रास प्रवाशांनी सहन करावा लागत आहे.उरण चारफाटा सर्कल हा कायमच गजबजलेला परिसर आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सिडकोने हाती न घेतल्यास खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघात होण्याची शक्याता आहे. त्यामुळे सिडकोने उरण शहराच्या प्रवेशद्वाराजवळील चारफाटा सर्कल रस्त्याचे काम त्वरीत हाती घ्यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे.