Breaking News

वृक्षतोडीमुळे कोकणातील तापमानात होतेय वाढ

वातानुकूलित कक्षात बसून अधिकारी घेत असलेल्या निर्णयामुळे कोकणातील अस्तित्वात असणारे डांबरी रस्ते उखडून नव्याने काँक्रिटीकरण होणार्‍या रस्त्यांसाठी वृक्षतोड होत आहे. कोकणातील पूर्वीचे 36 अंश असणारे तापमान आता वाढत आहे. रस्त्यांच्या कामात आडवी येणारी लाखो वृक्षसंपदा नष्ट झाल्याने कोकणातील तापमान खर्‍या अर्थाने वाढल्याचे चित्र कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. कोकणात जाणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला लागून असलेल्या खोपोली-वाकण फाटा व खोपोली-पेण रस्ता, वडखळ फाटा ते अलिबाग रस्ता, श्रीवर्धन-दिघी ते पुणे रस्ता, रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे ते रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगडपर्यंतचा रस्ता, कर्जत-नेरळ, मुरबाड-शहापूर हे रस्ते पूर्वी डांबरी होते. त्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या सर्व रस्त्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. त्याचा थेट परिणाम कोकणातील तापमान वाढीवर झाला आहे. मागील चार वर्षांपासून या रस्त्यांवरील झाडे भुईसपाट झाली आहेत. मात्र ज्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू आहे त्या रस्त्याच्या कडेला अद्याप एकही झाड लावण्यात आलेले नाही. याप्रकरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील या अधिकार्‍यांचे कान उपटले आहेत. त्यांनी स्वतः इंदापूर येथील कार्यक्रमात रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात याबद्दल खंत व्यक्त केली तसेच मनाला वेदनादेखील होत असल्याचे सांगितले. म्हणून त्यांनी राज्यातील मंत्र्यांनी याबाबत लक्ष देऊन जागरुकतेने झाडे लावण्याचे काम करावे व त्यावर देखरेख ठेवावी. झाडे लावताना ती साधारणतः तीन मीटर उंचीची असावीत, म्हणजे त्यांचा जगण्याचा दर वाढतो, अशा सूचनाही केल्या. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वारंवार नादुरुस्त होत आहे. चौपदरीकरणाचे काम केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने या रस्त्याचे चौपदरीकरण करीत असताना डांबरीकरणऐवजी काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला. मागील 11 वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे, मात्र त्यासाठी तोडण्यात आलेल्या झाडांच्या जागेवर 11 वर्षांच्या कारकिर्दीत एकही वृक्षलागवड केलेली नाही ही शोकांतिका आहे. रस्त्यासाठी संपादित केलेल्या जागेवर जर आज वृक्षलागवड केली असती तर 11 वर्षांत आज काही प्रमाणात तरी वृक्ष लागवड झाल्याचे फलदायी चित्र पाण्यात मिळाले असते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चौपदरीकरणाचे काम करीत असताना ते डांबरीकरणऐवजी काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यासाठी 100 वर्षांपूर्वीची आयुर्मान असलेले महाकाय सुमारे 50 फूट उंचीचे वृक्ष पूर्णपणे तोडण्यात आले. पळस्पे फाटा ते इंदापूर या पहिल्या टप्प्यात किमान दहा हजार झाडांची कत्तल करण्यात आली. त्यातील कर्नाळा खिंडीमधील झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात होती, तर इंदापूर ते कशेडी घाटपर्यंतच्या पट्ट्यामध्ये सुमारे तीन हजार झाडांची कत्तल करण्यात आली. ही झाडेदेखील 100 वर्षांपूर्वीची व 50 फूट उंच असलेली महाकाय वृक्ष होते. आज पळस्पे फाटा ते कशेडीपर्यंतच्या रस्त्यावर संपूर्ण रस्ता उघडा बोडका झाल्याचे पाहण्यास मिळते. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गावर सर्वच ठिकाणी हिच परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. या मार्गावरून एखादी गाडी बंद पडली तर पूर्वी वृक्षाचा सहारा घेऊन प्रवास करणारा प्रवासी आसरा घेत असेल, परंतु आता रणरणत्या उन्हात प्रवाशांना जीव नकोसा झाला आहे. कोकणात यापूर्वी प्रत्येक गावात चुलीवर जेवण करण्याची प्रथा होती. त्यासाठी दरवर्षी मार्च महिन्यापासून शेतकरी वर्ग जंगलात जाऊन वर्षभराचा लाकूड फाटा गोळा करून ठेवत असत, परंतु आता गावात असणारी माणसे मुंबई, पुणे येथे कामानिमित्त गेल्याने प्रत्येक गावात 15 टक्के घरे भरलेली आहेत. तसेच पूर्वीची मातीची असणारी घरे आता सिमेंट काँक्रीटची झाल्याने अनेक नागरिकांनी चुलीऐवजी गॅसवर स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतल्याने मागील दहा वर्षांत गावोगावीदेखील सरपणासाठी वृक्षतोड होण्याचे प्रमाण अल्प झाले आहे, मात्र गावोगावी होणार्‍या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमुळे तसेच विविध महामार्गांसह अन्य मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याच्या निर्णयामुळे वारेमाप वृक्षतोड होऊन पूर्वी 30 ते 36 डिग्री सेल्सियस अंश असणारे तापमान आज 38 अंशांपर्यंत पोचले आहे. या तापमान वाढीला नुसताच महामार्ग प्रकल्प जबाबदार आहे, असे नाही. तर वनखाते, सामाजिक वनीकरण हे विभागदेखील तितकेच जबाबदार आहेत. वृक्षांची तोड करायची की नाही, कोणते वृक्ष संवर्धीत आहेत, वनसंपदेचे रक्षण करणे ही जबाबदारी वनखात्याची आहे. चंदन तस्करी, खैर तस्करी, किटा यासाठी सह्याद्रीमधील सदाहरीत वनांची मोठ्या प्रमाणात तोड होत आहे. कोकणात जागा विकसित करण्याच्या नावाखाली जुनी आणि उपयोगी झाडे तोडली जात आहेत. उघडे पडलेले डोंगर पुन्हा वनाच्छादीत करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग झाडांची नर्सरी तयार करून तसेच बिया पेरून वनक्षेत्र वाढविण्यासाठी काम करणे अपेक्षित असते, मात्र हेच काम या विभागाकडून होताना दिसत नाही. ही वृक्षतोड अशीच होत राहिली तर भविष्यात कोकणाचे वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही.

-महेश शिंदे

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply