अलिबाग : प्रतिनिधी
राज्यातील महसुल कर्मचारी सोमवार (दि. 4)पासून बेमुदत संपावर गेले आहेत. रायगड जिल्ह्यातील शिपाई पदापासून ते पदोन्नत नायब तहसीलदारपर्यंत 540 कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. संपामुळे महसूल कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. संपकरी कर्मचा़र्यांनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यात कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज सुरू झालेल्या संपामुळे तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला. या कार्यालयातील कामकाजावर संपाचा मोठा परिणाम झाल्याचे दिसत असून कामकाज जवळपास ठप्प झाले आहे.अव्वल कारकून व मंडळ अधिकारी हा जिल्हास्तरीय संवर्ग असल्याने त्यांच्या याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रिया रद्द करावी, अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी यांची पदोन्नतीने नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती झाल्यानंतर त्यांना त्या त्या विभागातच पदस्थापना देण्यात यावी, नायब तहसीलदारांची तसेच महसूल सहाय्यकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, दांगट समितीने दिलेल्या अहवालानुसार पदे मंजूर करावीत, महसूल विभागातील अस्थायी पदे स्थायी करावीत, प्रधानमंत्री किसान योजनेसाठी स्वतंत्र पद निर्मिती करावी, कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करावी, महसूल दिन राज्यस्तरावर साजरा करावा व त्यासाठी निधी उपलब्ध करावा, संघटनेच्या पदाधिकार्यांना बदली प्रक्रियेत संरक्षण मिळावे, अशा त्यांच्या मागण्या आहेत. या मागण्यासाठी विविध मार्गाने आंदोलने करण्यात आली. त्यात एक दिवसाचे धरणे, निदर्शने, एक दिवसाचा लाक्षणिक संप, निषेध म्हणून रक्तदान शिबिर यांचा समावेश होता. याउपरही सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही तर 4 एप्रिलपासून बेमुदत संप करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने दिला होता. त्यानुसार आजपासून संपाचे हत्यार उपसले आहे.
मुरूड : प्रतिनिधी
येथील तहसील कार्यालयातील लिपिक, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, पदोन्नती नायब तहसीलदार वाहन चालक व शिपाई संपावर गेल्यामुळे मुरूड तहसील कार्यालयात सोमवारी कमालीची शांतता दिसून आली. आपल्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने 4 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता, त्याला प्रतिसाद देत मुरूड तहसील कार्यालयातील कर्मचारी संपावर गेले आहेत. मात्र तहसीलदार, नायब तहसीलदार व मंडळ संवर्गातील कर्मचारी उपस्थित होते. मागण्या मंजूर झाल्यानंतरच कर्मचारी कामावर हजर होणार असल्याची माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष केतन भगत यांनी दिली. दरम्यान महसूल कर्मचार्यांच्या संपामुळे नागरिकांचे हाल मात्र हाल होत आहेत.
महाड : प्रतिनिधी
राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार सोमवारपासून राज्यातील सर्व महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत. महाड तहसील कार्यालयातील महसुल कर्मचारीदेखील या संपात सहभागी झाल्याने येथील तहसील कार्यालयात सोमवारी शुकशुकाट होता. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली गेली. महसूल सहाय्यकांची रिक्तपदे तातडीने भरणे या व इतर 14 प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे महाड तहसील कार्यालयात सोमवारी शुकशुकाट जाणवला. ज्या लोकांना संपाबाबत माहिती नव्हती, अशा लोकांची अतिमहत्वाची कामे या संपामुळे खोळंबली.
कर्जत : बातमीदार
महसूल विभागातील अव्वल कारकून दर्जाच्या कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासन लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे महसूल कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या संपामध्ये कर्जत तालुक्यातील प्रांत आणि तहसील कार्यालयातील महसूल कर्मचार्यांनी सहभाग घेतल्याने त्याचा परिणाम महसूल विभागाच्या कामकाजावर झाला आहे. प्रलंबित मागण्यांसाठी गेली दोन वर्षे महसूल कर्मचारी संघटना आवाज उठवीत आहे. या कर्मचार्यांनी आपल्या मागण्यासाठी विविध प्रकारची आंदोलने केली आहेत. मात्र शासन न्याय देत नसल्याने महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने सोमवारपासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कर्जत तहसील आणि प्रांत कार्यालयातील कर्मचारी संपावर गेले आहेत. कर्जत प्रांत कार्यालयातील दिनेश गोल्हार, मिलिंद तिर्हेकर ,रोहीत बागुल, रवी तोंडरोड, तेजल उंबरे, बाळू आढाव, नथू गायकवाड आदी कर्मचारी संपात सहभागी आहेत. महसूल कर्मचारी संपावर गेल्याने शासकीय कामासाठी पोहचलेल्या जनतेचे हाल झाले.
पेण : प्रतिनिधी
पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने पेणमधील महसुल कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. संपावर गेलेल्या महसुल कर्मचार्यांनी पेण तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. राज्यातील महसूल विभाग आणि जिल्ह्यातील महसूल संघटनांनी 21 मार्च 2022 पासून निदर्शने, काळ्या फिती लावून काम, एक दिवसाचा लाक्षणिक संप अशी आंदोलने केली आहेत. तरीही सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे आता महसुल कर्मचार्यांनी सोमवारपासून बेमुदत संपावर जाण्याचे हत्यार उपसले आहे. रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केतन भगत, कार्याध्यक्ष गोवर्धन माने, खजिनदार वृषाली निंबरे, सरचिटणीस भूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपावर गेलेल्या महसूल कमर्चार्यांनी सोमवारी पेण तहसील कार्यालयाच्या प्रागंणात निदर्शनेही केली.