विद्याभवन शैक्षणिक संकुलात पारितोषिक वितरण समारंभ
नवी मुंबई ः बातमीदार, प्रतिनिधी
कठीण परिस्थिती आपल्याला घडवत असते. पाण्याचा दुष्काळ निश्चयी विद्यार्थ्यांच्या टॅलेंटवर परिणाम करीत नाही. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना ध्येय उच्च ठेवली पाहिजेत आणि ती गाठण्यासाठी त्यागही करावाच लागतो, तसेच शिस्त पाळणे हे देखील खूप महत्वाचे असते. अडथळे येतच राहतात, आपण त्यावर मात करायला शिकले पाहिजे. आपल्या जीवनातील प्रत्येक मायक्रो सेकंदही खूप महत्त्वाचा आहे. आई-वडील आणि गुरूंचा आदर आपण ठेवायलाच हवा, असे मार्गदर्शन ललिता बाबर यांनी विद्यार्थ्यांना केले. पुणे विद्यार्थीगृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शैक्षणिक संकुलात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ ऑलिंपिक खेळाडू आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या ललिता बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश मिळवणारे, शिष्यवृत्ती परीक्षेत निवड झालेले, तसेच शालेय आणि आंतरशालेय स्पर्धांमध्ये यश मिळवणार्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा सन्मान प्रमुख अतिथी ललिता बाबर यांच्या हस्ते या कार्यक्रमात करण्यात आला. पुणे विद्यार्थीगृहाचे संचालक दिनेश मिसाळ यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नूतन गवांदे आणि राधिका भोसले यांनी शिक्षण संकुलाच्या वार्षिक प्रगतीचा अहवाल सादर केला. पुणे विद्यार्थीगृह संस्थेचे माजी कार्याध्यक्ष प्रा. कृ. ना. शिरकांडे, संचालक राजेंद्र बोर्हाडे, दिनेश मिसाळ, संस्थेचे सल्लागार तुकाराम दौडकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष नंदलाल बॅनर्जी, पदाधिकारी प्रकाश लखापते, डॉ. किरण देशपांडे, मुख्याध्यापक शिवाजी माळी, सुवर्णा मिसाळ, श्रीजा नायर, मनीषा मुळीक, राजकुमारी इंदलकर, पर्यवेक्षक सुजय वाबळे, अस्मिता सलगर तसेच सर्व पालक प्रतिनिधी, शिक्षक आणि विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.