बैठकीत विविध विषयांवर निर्णय; सभेपुढे आलेल्या अर्जांना मंजुरी
पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर
महापौर कार्यालयाजवळील सभागृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. 29) महापौर सहाय्यता निधीची सर्वसाधारण बैठक घेण्यात झाली. या वेळी पनवेल महापालिकेच्या महापौर सहाय्यता निधीच्या पटलांवरील विविध विषयांना मंजुरी देऊन आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले.
या बैठकीस सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महापौर सहाय्यता निधी समितीचे सर्व सदस्य, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, लेखा परीक्षक विनयकुमार पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, नगरसचिव तिलकराज खापर्डे तसेच पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी रुग्ण रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर आजारी व्यक्तींना 30 दिवसाच्या आत महापौर सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत करण्यासाठी अर्ज करण्याच्या विषयास सभेने मंजूरी दिली. पनवेल महानगरपालिका मुख्यालयात महापौर सहाय्यता निधीतून मदत मिळण्याकामी प्राप्त झालेल्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या अविनाश मोकल यांच्या अर्जावर विचारविनिमय करून निर्णय घेण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. नवनाथनगर झोपडपट्टी रेल्वे स्टेशन पनवेल येथे आग लागल्याने आगीमध्ये नुकसान झालेल्या कुटुंबाना उत्तम भाऊ शिंदे, दौलत भाऊ शिंदे, रंजना उत्तम शिंदे आदिंना आपत्कालीन मदत करण्याबाबतच्या विषयास मंजुरी देण्यात आली.