Breaking News

दासगाव येथे कंटेनर उलटला

केमिकल गळतीने घबराट

महाड ः प्रतिनिधी

जेएनपीटीवरून महाड औद्योगिक वसाहतीमधील आक्वाफार्म कारखान्यामध्ये एचईडीपी रसायन घेऊन जाणारा कंटेनर गुरुवारी (दि. 25) सकाळी दासगाव हद्दीत पलटी झाला. कंटेनरमधील ड्रम फुटल्याने रसायन गळती सुरू झाली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. कंटेनर रस्त्याच्या कडेला तीन दुकानांवर पलटी झाल्यामुळे या दुकानांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

उरण जेएनपीटीवरून हायड्रोक्सी इथिलीतीन डाय फॉस्फोनिक अ‍ॅसिड ड्रममध्ये भरून महाड औद्योगिक वसाहतीमधील आक्वफार्म कारखान्यात आणताना कंटेनर (क्रमांक एम. एच. 46 ए. आर. 7053) हा गुरुवारी सकाळी 6.30 वाजेदरम्यान दासगाव हद्दीत एका वळणावर रस्त्यालगत असलेल्या तीन दुकानांवर पलटी झाला. कंटेनर पलटल्यानंतर ड्रमला गळती सुरू झाली. फुटलेल्या ड्रममधील रसायन गावातील रस्त्यावर वाहू लागले. या अपघातामध्ये सचिन दासगवकर, सलीम कारवीनकर व प्रकाश सोनार या तीन दुकानदारांचे मोठे नुकसान झाले.

सकाळी दुकाने बंद असल्याने मोठी हानी टळली. रसायन गळतीमुळे संपूर्ण दासगावमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी घातक रसायनाचा टँकर पलटी होऊन संपूर्ण रसायन रस्त्यावर वाहत गेले होते. या वेळी संपूर्ण परिसर रिकामा करण्याची वेळ आली होती. अपघाताची माहिती मिळताच महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. बी. अवसरमोल तसेच महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनीही त्या ठिकाणी धाव घेतली. महाड औद्योगिक क्षेत्रातील संदेश महागावकर, संजय साळुंखे यांनी घटनास्थळी पोहचून रसायन घातक नसल्याची खात्री दिल्यानंतर गावकर्‍यांची भीती दूर झाली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply