मुरुड न.प.च्या शाळेमधील विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी


मुरूड : प्रतिनिधी
शहरातील कोळीवाडा परिसरात असलेल्या मुरूड नगरपालिकेच्या शाळा नंबर एकची इमारत 100 वर्षांपूर्वीची असल्याने मोडकळीस आली आहे. ती विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित राहिली नसल्याने नगर परिषदेने या शाळेच्या मागच्या बाजूस नवीन शाळा इमारत उभारण्याचा घाट घातला आहे. मात्र मागील चार वर्षांपासून नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याचे नावच घेत नाही. या शाळेची जुनी इमारत धड नाही आणि नवीन इमारत पूर्ण नाही, अशा परिस्थितीत आपल्या पाल्याला या शाळेत पाठवायचे कसे याची चिंता पालकांना पडली आहे.
मुरूड नगरपालिकेच्या शाळा नंबर एकमध्ये कोळी समाजातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. ख्यातनाम अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह अनेक नामवंत डॉक्टर, वकील यांनी याच शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन नावलौकीक मिळविले आहे. 100 वर्षापूर्वीच्या या शाळेची इमारत आता कमकुवत झाली आहे. या इमारतीचा जिना मोडकळीस आला आहे. लाद्या उखडल्या असून, छपराला आधारासाठी लावलेले खांब जीर्ण झाल्याने त्यांना लाकडी काठ्यांचा आधार देण्यात आला आहे. त्यामुळे या शाळेत बसणे विद्यार्थ्यांना धोकादायक झाले आहे.
शाळेची जुनी इमारत नुतनीकरणाची वाट पाहत असतानाच नगर परिषदेने या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत नवीन शाळा इमारत बांधण्याचा घाट घातला आहे. मात्र गेल्या चार वर्षापासून हे अर्धवट आहे. वाळू मिळत नसल्याने काम थांबल्याचे ठेकेदार सांगत असला तरी, हे काम पूर्ण का होत नाही, याचे समाधानकारक उत्तर नगर परिषदेतील सत्ताधारी पक्ष देत नसल्याने पालकांमध्ये राग व्यक्त केला जात आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी म्हणजे येत्या जून महिन्यात शाळेची नवीन इमारत पूर्ण होणे गरजेचे आहे. या शाळा इमारतीचे काम रखडवल्यामुळे ठेकेदारास ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येणार होते. मात्र ठेकेदारांने विनंती केल्यामुळे त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र आता ठेकेदाराने कोणतेही कारण न देता तातडीने इमारत पूर्ण करून देणे आवश्यक असल्याचे मत पालकवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
शाळा क्रमांक एकमध्ये प्रामुख्याने कोळी समाजातील मुले शिक्षण घेत आहेत. या शाळेची इमारत खूप जुनी असल्याने धोकादायक झाली आहे. त्यामुळे नवीन इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे हिताचे आहे.
-मनोहर बैले, अध्यक्ष, महादेव कोळी समाज, नवापाडा मुरूड
या शाळेच्या नवीन इमारतीसाठी जिल्हा नगरोत्थानमधून 56 लाखाचा निधी प्राप्त झाला आहे. रेती मिळत नसल्याची सबब देऊन संबंधित ठेकेदार हे काम लांबवत आहे. त्याबद्दल ठेकेदाराला नोटीससुद्धा बजावण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थिती येत्या जून महिन्यात नवीन इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना बसवू.
-दयानंद गोरे, मुख्याधिकारी, मुरूड नगर परिषद