Breaking News

विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत भूमिपुत्रांचा संघर्ष सुरूच राहणार

कृती समिती अध्यक्ष दशरथ पाटील यांचा इशारा

नवी मुंबई ः प्रतिनिधी

लोकनेते स्व. दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची 29 गाव संवाद बैठक बुधवारी (दि. 18) झाली. या बैठकीत 24 जून या ‘दिबां’च्या पुण्यतिथीनिमित्त पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन आंदोलन होणार असल्याचे उपस्थित नेत्यांनी सांगितले. मुंबईत एखाद्या पक्षाला बीकेसीवर सभेला परवानगी मिळते, मग आम्हाला सभेसाठी सिडको भवनसमोर परवानगी का देत नाही? असा खडा सवाल कृती समिती अध्यक्ष दशरथ पाटील यांनी विचारला. मी ‘दिबां’चा पाठीराखा आहे. प्रसंगी उपनेते पदाचा राजीनामा देईन, पण नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करीत राहिन, असे अध्यक्षीय भाषणात त्यांनी ठणकावून सांगितले. आ. गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील ग्रामस्थ जमिनीचे मालक आहेत त्यांनी गावकमिटीच्या गावनिहाय गठन समित्या कराव्यात. त्याप्रमाणे शहरातील सर्वच नागरी नोड आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या नागरिकांच्या रहिवासी व जागा मालकी हक्कासाठी एकत्रित राहावे जेणेकरून कुणीही शहरातला भूमीपुत्र आणि रहिवासी नागरिक भाडेकरु होणार नाही. नवी मुंबई विमानतळाला दि. बां. चे नाव द्यावेच लागेल. नामांतरासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर नागरिकांच्या सोबत उतरणार, असे सांगितले. मच्छिमारांचे नेते विजय वरळीकर यांनी  विमानतळ नामकरणाला पाठिंबा दिला. माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी दिबांच्या आंदोलनात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले, असे सांगितले.  विमानतळ आंदोलनात मी व आमचे समाज बांधव पूर्णपणे सहभागी असल्याचा जाहीर पाठिंबा दिला. या बैठकीसाठी स्व. दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष व भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी खा. डॉ. संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, मवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व कृती समितीचे सदस्य दशरथ भगत, डॉ. राजेश पाटील, ओबीसी नेते राजाराम पाटील, मनोहर पाटील, दिपक पाटील, कॉ. भूषण पाटील, जे. डी. तांडेल माजी नगरसेविका फशीबाई भगत, वैजयंती भगत, शैलेश घाग, अ‍ॅड. शिल्पा पाटील, विनोद म्हात्रे, उत्तम म्हात्रे आदी उपस्थित होते. 24 जूनचे  आंदोलन हे पुनश्च एकदा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बां. पाटील यांचे नाव देण्यासाठी सरकारला इशारा देणारे असणार आहे. एक लाखाहून अधिक आगरी, सागरी व शहरातील भूमिपुत्र येत्या 24 जून रोजी एकजूट दाखवणार आहेत, असेही बैठकीत सांगण्यात आले.

जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा -आमदार प्रशांत ठाकूर

नामकरण व भूमिपुत्रांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सर्वांनी एकत्र या, अन्यथा ‘असुनी नाथ, मी अनाथ’ अशी गत होईल. आपल्या भावी पिढीच्या अस्मितेसाठी सर्वांनी एकसंघ होऊन पुढील महिन्यात 24 जूनच्या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आवाहन केले.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply