अलिबाग ः प्रतिनिधी
झुंझार युवक मंडळ पोयनाडच्या षष्टब्दीपूर्ती वर्षाच्या निमित्ताने आयोजित 12 वर्षांखालील एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 23) भेंडखळ क्रिकेट अकॅडमी उरण व प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल यां संघामध्ये झाला. त्यामध्ये पनवेल संघाने बाजी मारत अंतिम विजेता संघ म्हणून मान मिळविला आहे. या स्पर्धेत संपूर्ण रायगड जिल्ह्यातील 12 संघांनी सहभाग घेतला होता. साखळी व बाद पद्धतीने सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 22 दिवस ही स्पर्धा मोठ्या उत्साहात खेळली गेली. अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या पनवेल संघाने 40 षटकांच्या अखेरीस सर्व गडी गमावत 199 धावा केल्या. मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज पार्थ पवार याने सुरेख फलंदाजी करीत 35, तर शौर्य गायकवाडने धुवाँधार खेळी करून 44 धावा ठोकल्या. भेंडखळ संघाकडून कर्णराज देशमुख याने तीन, तर अंजली गोडसे व वेड कडू यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. 200 धावांचे लक्ष घेऊन फलंदाजी आलेल्या भेंडखळ संघाचे सलामीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज जिग्नेश म्हात्रे व आशिर्व पाटील यांनी संयमी फलंदाजी करीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. डावखुरा तंत्रशुद्ध फलंदाज जिग्नेश म्हात्रेने 25, तर संयमी फलंदाजी करणारा आशिर्व पाटीलने 20 धावा केल्या. हे फलंदाज बाद झाल्यानंतर भेंडखळ संघ डगमगला. पनवेल संघाचा फिरकी गोलंदाज अथर्व पाटीलने तीन, तर आर्यन जाधव, पंकज इटकर, दक्ष आवले, झाइद खान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. सरतेशेवटी भेंडखळ संघाचा संपूर्ण डाव 77 धावांवर आटोपला आणि पनवेल संघाने अंतिम सामना तब्बल 122 धावांनी जिंकला. स्पर्धेची संपूर्ण नियमावली उरणचे क्रिकेट तज्ज्ञ व प्रशिक्षक नायन कट्टा यांनी अधोरेखित केली होती. त्यामुळे स्पर्धा शिस्तबद्ध व शांततेत झाली. अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून अथर्व पाटील, संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्टपणे फलंदाजी करणारे जिग्नेश म्हात्रे, आरुष कोल्हे यांना उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ईशान पाठक, तर मालिकावीर म्हणून पार्थ पवार यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जावेद पटेल यांच्याकडून पनवेल संघाला, तर नकुल काळे यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचा चषक भेंडखळ संघाला देण्यात आला. बक्षीस वितरण समारंभास माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, निवृत्त महसूल कर्मचारी अनंत राऊत, आंबेपूरचे सदस्य शैलेश पाटील, शहापूर ग्रामपंचायतीचे सदस्य स्वप्नील पाटील, पोयनाड ग्रामपंचायत सदस्य अजित चवरकर, रत्नाकर तावडे, झुंझार युवक मंडळाचे अध्यक्ष अन्वर बुराण, किशोर तावडे, दीपक साळवी, अजय टेमकर, सुजित साळवी, अॅड. पंकज पंडित, संकेश ढोळे, आदेश नाईक यांच्यासह पोयनाड विभागातील क्रिकेटरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.