Breaking News

तुर्भे शाळेत चिक्कीमध्ये अळ्या

नवी मुंबई : बातमीदार : नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या चिक्कीत चक्क अळ्या सापडल्या आहेत. या प्रकाराने खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तुर्भे गाव शाळा क्रमांक 20मध्ये शाळेत नेहमीची चिक्की वाटली जात होती, मात्र या चिक्कीत अळ्या आढळल्याचे निष्पन्न झाले. लागलीच ही चिक्की विद्यार्थ्यांकडून परत घेण्यात आली, परंतु यानिमित्ताने चिक्कीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शासनाच्या नियमानुसार कंत्राटदार, शाळेत चिक्की वाटप करणारे कर्मचारी, मुख्याध्यापक व शिक्षकांनी मुलांना खिचडी किंवा चिक्कीसारखे खाऊ देताना स्वतः ते खाऊन पाहणे आवश्यक आहे. पालिका शाळांतील अनेक विद्यार्थ्यांनी त्यांना दिल्या जाणार्‍या चिक्कीचा दर्जा व चव योग्य नसल्याच्या तक्रारी शिक्षकांकडे केल्याचे आढळून आले आहे, मात्र त्याबाबत पालिका प्रशासनाला जाग आल्याचे दिसत नाही.

अनेक मुले दिलेली चिक्की शाळेतच खातात. काही मुले ती चिक्की घरी आणून खातात. त्यामुळे कित्येक लहान मुलांना चिक्की खाताना कळतही नसते की चिक्की योग्य आहे की अयोग्य. त्यामुळे इयत्ता तिसरीच्या ज्या मुलीच्या चिक्कीत अळ्या आढळून आल्या, तिच्यासोबतच्या कित्येक विद्यार्थ्यांच्या चिक्कीचा दर्जा अयोग्य असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही मुले आजारी पडल्यास त्याची जबाबदारी पालिका घेणार का, असा प्रश्न उभा राहिला आहे.

दरम्यान, याबाबत माझ्यापर्यंत माहिती आलेली नाही. तातडीने माहिती घेऊन कळवतो, अशी प्रतिक्रिया शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी दिली.

गोडाऊन गलिच्छ?

चिक्कीने किती सकस आहार मिळतो याबाबत प्रशासनाला प्रश्न विचारून रबाळेतील एका घाणेरड्या गोडाऊनमध्ये चिक्की तयार करून त्यावर लोणावळ्याचे लेबल लावले जाते, असा आरोप शिवसेनेच्या सदस्यांकडून करण्यात आला होता, तसेच या चिक्कीचा दर्जा आजपर्यंत पालिकेने तपासला आहे का, अशीही विचारणा करण्यात आली होती.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply